News Flash

ठाण्यातील वाहतूक समस्येच्या निराकरणासाठी नित्य प्रयत्नशील

विनय सहस्रबुद्धे यांची ग्वाही

ठाण्यातील वाहतूक समस्येच्या निराकरणासाठी नित्य प्रयत्नशील
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

विनय सहस्रबुद्धे यांची ग्वाही

केवळ ठाणे महापालिका क्षेत्र नव्हे, तर मुंबई महापालिकेच्या सभोवताली असलेल्या नऊ महानगरपालिकांच्या मूलभूत समस्या या वेगळ्या आहेत. रस्ते, वाहतूक, कचरा, घरबांधणी, वाहतुकीच्या समस्या इत्यादी विषयांचा एकत्रित विकास आराखडा केला गेला पाहिजे, हा विषय मी सातत्याने मांडत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी एका केंद्रीय मंत्रिगटाची स्थापना केली जावी अशी मागणी मी राज्यसभेत केली आहे, असे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांनी मांडले.

ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक समस्या दिवसेंदिवस ऊग्र बनत असून, या शहरांना कोणीही वालीच नसल्याची परिस्थिती आहे. या समस्येबाबत ‘लोकसत्ता’ने नेहमीच पाठपुरावा केला आहे आणि ३ ऑगस्टच्या अंकात विशेष पानही प्रसिद्ध केले. या पानातील ‘मुर्दाड राजकारणी, बेशरम प्रशासन’ या विशेष संपादकीयातील उल्लेखाविषयी खुलासा करताना सहस्रबुद्धे यांनी म्हटले आहे, की जेएनपीटी क्षमतावाढीमुळे ठाणे शहरावर वाढणारा जड वाहतुकीचा ताण -विशेषत मुंबईकडून नाशिक व गुजरात दिशेने होणारी ट्रक वाहतूक- कमी करण्यासाठी आपण उरण-पनवेल-भिवंडी-वसई अशी रेल्वेच्या माध्यमातून रोरो सेवा चालू करावी अशी मागणी केली. त्यावर रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक पावले उचलून या मार्गावर चाचणी फेरी घेतली असून सध्या त्याच्या तांत्रिक आणि व्यावसायिक बाबींची पूर्तता चालू आहे. तसेच भिवंडी येथे मोठय़ा प्रमाणात उभ्या राहिलेल्या गोडाऊनमधून रस्त्यावर कमी वाहने यावीत यासाठी तिथे एक रेल्वे स्टेशन प्रस्तावित केले आहे.

गेली अनेक वष्रे रखडलेला कोपरी पुलाचा विषय मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक, एमएमआरडीए आयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त यांच्यात समन्वयासाठीही प्रयत्न केल्याचेही सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले. ठाणे पोलीस आयुक्त, वाहतूक सहायक आयुक्त यांच्या संयुक्त बठका व्हाव्यात या साठीही आपण प्रयत्न केले. शहरी वाहतूक विषयात अभ्यास करण्याऱ्या वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिटय़ूटसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून शहरातील अधिक कोंडी होणाऱ्या चौकांचा अभ्यास करून घेऊन त्याचा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर केल्याची माहिती सहस्रबुद्धे यांनी दिली. ठाणे शहराचा नागरिक आणि गेली दोन वर्षे राज्यसभ सदस्य या नात्याने आपण नेहमीच वाहतुकीच्या ज्वलंत समस्येचा प्रामाणिक पाठपुरावा करत आहोत, असे सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2018 1:36 am

Web Title: traffic congestion in mumbai 6
Next Stories
1 ठाण्यात दिवसाढवळ्या तरूणीवर चाकूहल्ला, तरूणीचा मृत्यू
2 अश्लील चित्रफिती पसरवणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप समूहावर कारवाई
3 रिक्षाचालकांची मनमानी सुरूच
Just Now!
X