महामार्गावर कोंडी आणि उपनगरी रेल्वे उशिराने

उपनगरी रेल्वेच्या फलाटांवरील तोबा गर्दी, खच्चून भरलेल्या लोकल, त्या पकडण्यासाठी उडणारी झुंबड, गाडय़ांच्या वक्तशीरपणाचे वाजलेले तीनतेरा आणि यात भर म्हणून मुंबई-ठाणे-नवी मुंबईला जोडणाऱ्या महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेले प्रवासी अशी दृश्ये रविवारी ठिकठिकाणी दिसत होती. रक्षाबंधनाचा सण अशा दुहेरी कोंडीत साजरा झाला.

रक्षाबंधन आणि रविवार असा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने या सणात व्यत्यय येऊ नये म्हणून रेल्वेने रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला होता. लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवण्यात येत होत्या. परंतु त्या नेहमीप्रमाणे १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. परिणामी फलाटांवरील गर्दी क्षणाक्षणाला वाढत होती. लोकलमध्ये शिरायलाही वाव नव्हता.

मुलाबाळांसह बाहेर पडलेल्या लोकांना गाडी पकडताना आणि गाडीतून उतरताना जीवाचे नाव शिवा ठेवावे लागत होते. लोकलमधील गर्दीत महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना हाल सोसावे लागले. धक्काबुकी, भांडणे असे प्रकारही घडले.

ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर या प्रमुख स्थानकांवर गर्दी उसळल्यामुळे प्रवाशांना गाडीत चढण्याची आणि उतरण्याची शिस्त लावण्याचे काम आरपीएफच्या जवानांना करावे लागले. मेगाब्लॉक रद्द करूनही रेल्वेने होमप्लॅटफॉर्मवरून सुटणाऱ्या अनेक गाडय़ा रद्द केल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. ठाण्याच्या फलाटावरून एकही गाडी न सोडल्यामुळे दुपारी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आणि रक्षाबंधन साजरे करण्यासाठी बाहेर पडलेल्यांची रस्त्यांवरही कोंडी झाली. रक्षाबंधनानिमित्त मुंबईहून ठाणे, नवी मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. आजही असेच चित्र होते. खासगी मोटारी, रिक्षा, टॅक्सी आणि बेस्टच्या जादा गाडय़ांमुळे वाहनांची संख्या लक्षणीय वाढली होती. रस्त्यांवरील खड्डय़ांमुळेही महामार्गावर वाहतूककोंडी झाली. खड्डय़ांमुळे वाहनांचा वेग मंदावल्याने सायन-पनवेल आणि ठाणे-बेलापूर मगामार्गावर काही ठिकाणी वाहनांच्या रांगा कासवगतीने पुढे सरकत होत्या.

बोरिवली ते ठाणे या प्रवासासाठी दोन ते अडीच तास, तर गोरेगाव, बोरिवली ते नवी मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी चार ते पाच तास लागत होते. एलबीएस, लिंक रोड, जेव्हीएलआर, एस. व्ही. रोडसह पूर्व द्रूतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होती. त्यातच मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याच्या कामामुळे अवजड वाहने ठाणे, ऐरोली मार्गे वळविण्यात आल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली होती.

इंडिकेटरमध्ये बिघाड

मध्य रेल्वेच्या काही स्थानकांवरील इंडिकेटर्समध्ये बिघाड झाला. ठाणे, डोंबिवली आणि अन्य काही स्थानकांवरील इंडिकेटर्स गाडी गेल्यानंतरही बदलली जात नव्हती. परिणामी प्रवाशांचा गोंधळ उडत होता. प्रवाशांनी इंडिकेटर्सकडे लक्ष न देता उद्घोषणांकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही काही स्थानकांमध्ये करण्यात येत होते.

इंडिकेटरमध्ये बिघाड

मध्य रेल्वेच्या काही स्थानकांवरील इंडिकेटर्समध्ये बिघाड झाला. ठाणे, डोंबिवली आणि अन्य काही स्थानकांवरील इंडिकेटर्स गाडी गेल्यानंतरही बदलली जात नव्हती. परिणामी प्रवाशांचा गोंधळ उडत होता. प्रवाशांनी इंडिकेटर्सकडे लक्ष न देता उद्घोषणांकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही काही स्थानकांमध्ये करण्यात येत होते.

उपनगरातील रस्त्यांवर खड्डे आहेत. काही भागांत अनेक कामेही सुरू आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. ती सोडवण्याचे प्रयत्न वाहतूक पोलिस करीत आहेत – शशी मीना, पोलीस उपायुक्त (वाहतूक), पश्चिम उपनगर