ग्राहकांच्या गर्दीमुळे दक्षिण मुंबईत वाहतूक विस्कळीत

मुंबई : दिवाळीच्या खरेदीसाठी महात्मा फु ले मंडईसह (क्र ॉफर्ड मार्केट) सर्व चीजवस्तूंच्या बाजारपेठा ग्राहकांनी फु लल्याने सलग तिसऱ्या दिवशी संध्याकाळी दक्षिण मुंबईत जागोजागी वाहतूक खोळंबली. क्र ॉफर्ड मार्केटमधील ग्राहकांसह त्यांच्या वाहनांनी के लेल्या गर्दीचा परिणाम परळपर्यंत जाणवला. सोमवारी संध्याकाळी लालबाग उड्डाणपुलाच्या परळ येथील तोंडापासून क्र ॉफर्ड मार्केटपर्यंत वाहने मुंगीच्या वेगाने पुढे सरकत होती. त्यामुळे बेस्टसह अन्य मोठय़ा वाहनांना हे अंतर कापण्यासाठी दीड ते दोन तासांहून अधिक अवधी लागत होता.

एरव्ही संध्याकाळी दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणारे सर्वच प्रमुख मार्ग तुलनेने मोकळे असतात, तर उत्तरेकडे म्हणजेच दक्षिण मुंबईतून मध्य मंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असते. त्यामुळे ज्या ठिकाणी मार्ग चिंचोळे आहेत, तिथे वाहतूक तुंबते. मात्र शनिवारपासून सोमवापर्यंत, सलग तीन दिवस संध्याकाळी दक्षिण मुंबईच्या दिशेकडे वाहनांची वाहतूक मोठय़ा संख्येने वाढली.

शनिवार, रविवारप्रमाणे ग्राहक सोमवारीही दिवाळीनिमित्त खरेदीसाठी घराबाहेर पडले. लोकल सेवा सुरू नसल्याने या ग्राहकांनी खासगी वाहन, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी, अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवेने दक्षिण मुंबई, दादरसह स्थानिक बाजारपेठा गाठल्या. त्यामुळे या तीन दिवसांत दक्षिण मुंबईतून बाहेर पडणाऱ्या वाहनांसोबत दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली. दोन्ही दिशांना वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत होती. त्यातच खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी वाहनतळ उपलब्ध नसल्याने रस्त्याकडेला उभी के ली. त्याचाही परिणाम वाहतुकीवर झाला. परिणामी दक्षिण मुंबईत वाहतुकीचे नियमन करण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर निर्माण झाले, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

संध्याकाळी दक्षिण मुंबईतून बाहेर पडणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता पी. डीमेलो मार्गावरील दक्षिण वाहिनीवरून (शिवडीकडून सीएसएमटीकडे येणारी) पूर्व मुक्त मार्गावर वाहने सोडली जातात. मात्र गेल्या तीन दिवसांत दक्षिण वाहिनीवरील वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक नियमनासाठी पोलिसांनी काढलेली ही शक्कल निरुत्तर ठरली.

ठाणे, नवी मुंबई आणि पूर्व उपनगरांतून पूर्व द्रुतगती मार्गावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आलेल्या वाहनांना सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास लालबाग उड्डाणपूल चढून आल्याआल्याच खोळंबा लागला. तिथपासून मुंगीच्या वेगाने सरकत सरकत वाहने जेजे उड्डाणपुलापर्यंत पोहोचली. जेजे उड्डाणपुलावरून अवजड वाहने आणि दुचाकींना परवानगी नसल्याने पुलाखालील महंमद अली मार्ग ते हज हाऊसपर्यंतचे अंतर कापताना वाहन चालक, प्रवासी कासावीस झाले. रस्त्याकडेला होणारी अवैध पार्किंग, बाजारपेठा असल्याने हातगाडीवरून माल वाहून नेणारे माथाडी, मालवाहू मोटारी, बेस्ट बस अशा मोठय़ा वाहनांमुळे येथील पूर्णपणे खोळंबून होती. संध्याकाळी या संपूर्ण मार्गावर प्रत्येक चौक, तिठय़ांवर वाहतूक पोलीस होते. मात्र वाहनांची संख्याच जास्त असल्याने त्यांनी प्रयत्न करूनही वाहतुकीचे नियमन होऊ शकले नव्हते.

अन्यत्रही तीच परिस्थिती

हीच परिस्थिती दादर, शिवाजी पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, एस. व्ही. मार्ग येथे होती. बोरिवली स्थानकाबाहेर एस. व्ही. मार्गावर विविध वस्तूंची बाजारपेठ असून तेथेही खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. ग्राहकांसोबत त्यांच्या वाहनांमुळेही नेहमीची वाहतूक खोळंबते.