25 January 2021

News Flash

मेट्रो स्थानकाबाहेर वाहतूक एकत्रीकरण

अडीचशे मीटर परिघात रिक्षा, टॅक्सी, बस, सायकलची सुविधा

(संग्रहित छायाचित्र)

मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना स्थानकाबाहेर आल्यानंतर आपल्या ईप्सित स्थळी पोहोचण्यासाठी वेगवेगळय़ा वाहतूक सुविधांचा वापर करता यावा, यासाठी मेट्रोच्या स्थानकांबाहेर बस, रिक्षा, टॅक्सी, सायकल, ई-बाइक असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यावर्षी कार्यान्वित होऊ घातलेल्या मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ या दोन मार्गिकांवरील एकूण ३० स्थानकांबाहेर वाहतूक बहुपर्यायी सुविधांचे एकत्रीकरण (मल्टिमोडल इंटिग्रेशन) करण्यात येणार आहे.

मेट्रो २ ए (डीएन नगर ते दहिसर) आणि मेट्रो ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) या दोन मार्गिका यावर्षी जुलैच्या आसपास कार्यरत होण्याची शक्यता आहे. या मार्गिका लिंक रोड आणि पश्चिम द्रुतगती मार्ग या दोन महत्त्वाच्या अतिगर्दीच्या रस्त्यावर आहेत. त्यामुळे स्थानक परिसरात प्रवाशांना सुलभ आणि जलद वाहतूक सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठीच ‘मल्टी मोडल इंटिग्रेशन’ यंत्रणा कार्यरत करण्यात येत आहे. एकूण चार पॅकेजमध्ये ही कामे करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या सुविधांमध्ये बस, रिक्षा आणि टॅक्सी थांब्यांची विशेष मार्गिका, सायकल ट्रॅक, पादचारी मार्गाचे रुंदीकरण, जागेचे स्थलदर्शक नकाशे, पादचारी पूल, तसेच पार्किंग निर्बंध अशा बाबींचा समावेश आहे. त्याचबरोबर ई-बाईक वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्या उपलब्ध करण्याचे प्रस्तावित असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांना स्थानकापर्यंत पोहचणे आणि स्थानकातून इच्छित स्थळी जाण्याच्या (फर्स्ट अ‍ॅण्ड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी) दृष्टीने या सर्व सुविधांचा लाभ होईल असे त्यांनी नमूद केले.

मेट्रो मार्गिकेवर काही ठिकाणी लांब पल्लय़ाच्या गाडय़ांचे थांबे पूर्वीपासून आहेत. अशा ठिकाणी लांब पल्लय़ांच्या खासगी बसगाडय़ांसाठी मेट्रो स्थानकाबाहेर विशेष सुविधा देण्यात येईल. विशेषत: बोरिवली पूर्वेला लांब पल्लय़ाच्या खासगी बसगाडय़ा सुटण्याचे मोठे केंद्र आहे. त्यांनादेखील या सुविधेत सामावून घेतले जाईल. तसेच सध्या दोन मेट्रो स्थानकातून खासगी संकु लांना दोन ठिकाणी थेट जोडणीचे प्रस्ताव आले असून त्या संदर्भात काम सुरू आहे.

पाच वर्षांपूर्वी घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो १ मार्गिका सुरू करण्यात आली. मात्र या मेट्रो मार्गिकेच्या स्थानकाबाहेर अशा सुविधांचा सध्या पूर्ण अभाव आहे. परिणामी अनेक ठिकाणी वाहतूककोंडी, तसेच प्रवाशांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. तशा अडचणी मेट्रोच्या या दोन स्थानकांबाहेर येणार नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 12:04 am

Web Title: traffic congestion outside the metro station abn 97
Next Stories
1 हार्बरच्या विस्तारीकरणाचे काम पावसाळय़ानंतर
2 गोवंडी-मानखुर्द, जुईनगर-तुर्भे पूल अधांतरी
3 पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कायम
Just Now!
X