विक्रोळीतील पादचारी पुलावरील मार्गावरोधक हटवून नागरिकांची ये-जा सुरू असल्याचा पालिकेचा दावा

मुंबई : महापालिकेच्या तांत्रिक सल्लागारांनी अतिधोकादायक ठरविलेल्या १४ पैकी कुर्ला आणि कांदिवली येथील उड्डाणपुलांवरून आजही वाहनांची वाहतूक सुरू असून विक्रोळी येथील पादचारी पुलावरून पादचारी ये-जा करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालिकेने बंद केलेल्या पादचारी पुलावरील मार्गावरोधक (बॅरिकेड्स) हटवून नागरिकांनी त्याचा वापर सुरू केल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे. तर १४ पैकी एक उड्डाणपूल आणि तीन पादचारी पूल पाडून टाकण्यात आले असून चार उड्डाणपूल, रेल्वे मार्गावरील एक पादचारी पूल आणि दोन पादचारी पूल वापरासाठी बंद करण्यात आला आहे.

दादाभाई नौरोजी मार्गावरील बी. टी. लेन येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये जाणारा पादचारी पूल गेल्या गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला आणि या दुर्घटनेत सहा ठार, ३० जण जखमी झाले. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुंबईमधील पादचारीपूल, उड्डाणपूल आणि आकाशमार्गिका (स्कायवॉक)चा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पालिकेने मुंबईमधील पुलांच्या संरचनात्मक तपासणीसाठी तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती केली होती. या सल्लागारांनी मुंबईमधील पुलांची तपासणी करून अहवाल पालिका प्रशासनाला सादर केला होता. या अहवालात मुंबमधील सात उड्डाणपूल, सहा पादचारीपूल आणि रेल्वे मार्गावरील पादचारीपूल अतिधोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले होते.

तांत्रिक सल्लागारांनी धोकादायक ठरविलेले दोन उड्डाणपूल आणि एक पादचारीपुलाचा आजही वापर होत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यात कुर्ला (प.) येथील साकिनाका येथील खैरानी रोडवरील हरी मस्जिद नाल्याजवळी, तसेच कांदिवली परिसरातील एस. व्ही. पी. रोडवरील कृष्णकुंज इमारतीजवळील उड्डाणपुलांचा, तसेच विक्रोळी, पंतनगर येथील कन्नमवार नगरमधील मातृछाया चाळ इमारत क्रमांक ४२ जवळील पादचारीपुलाचा समावेश आहे. हा पादचारीपूल पालिकेने रस्ता रोधक बसवून बंद केला होता. मात्र काही अज्ञात नागरिकांनी पादचारीपुलावरील रस्ता रोधक हटविल्यामुळे पुन्हा त्याचा  वापर होऊ लागल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.

पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

पालिकेकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरुन शहरातील ‘यलो गेट’जवळील पादचारी पूल पाडून टाकण्यात आला असून महर्षी धोंडो केशव कर्वे मार्गावरील दोन पादचारीपूल रस्ता रोधक बसवून बंद करण्यात आले आहेत. तसेच वांद्रे येथील पाईपलाईन मार्गवरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पश्चिम उपनगरामधील कुरार व्हिलेज येथील बिहारी टेकडी परिसरातील गांधीनगरमधील उड्डाणपूल पाडण्यात आला असून या पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम उपनगरातील कुरार व्हीलेज येथील पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले असून गोरेगाव, कांदिवली येथील रगडा पाडा, हनुमाननगरातील आकुर्ली रोडवरील पूल  बंद करण्यात आले आहेत. पूर्व उपनगरांतील मुलुंड (प.), घाटकोपर येथील पादचारी पूल बंद केले असून पवई येथील पादचारीपूल पाडून टाकण्यात आला आहे. मात्र आजही दोन उड्डाणपूल आणि पादचारीपूल सुरू असल्यामुळे पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.