पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्यामध्ये वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला एका वाहनाला थांबविण्यासाठी गोळीबार करण्याची वेळ बुधवारी रात्री आली. वाहनचालकाने इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत पोलीस हवालदाराचो अपहरण करून पलायन केले होते.
कर्नाळा खिंडीमध्ये रस्त्याकडेला खोल खड्डय़ामध्ये एक क्रेन पडली होती, ती क्रेन उचलण्याचे काम सुरू असताना ही घटना घडली. क्रेन उचलण्यासाठी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. त्या वेळी सहायक पोलीस निरीक्षक नीलेश माने व त्यांचे सहकारी पोलीस हवालदार राजेश बैयकर हे वाहतूक नियमनाचे काम येथे करीत होते. पोलिसांनी मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक काही वेळेसाठी सोडल्यावर गोव्याकडून मुंबईला जाण्यासाठी उभा असलेला ट्रक पोलिसांच्या मनाईनंतरही एकेरी वाहतुकीमध्ये शिरला. पोलीस हवालदार राजेश बैयकर यांनी या ट्रकचालकाला रोखण्याचा प्रयत्न केला  याचदरम्यान ट्रकाचालकाने पोलीस हवालदार बैयकर यांनाच गाडीत उचलून घेतले. हवालदाराचे अपहरण झाल्याचे लक्षात आल्यावर सहायक पोलीस निरीक्षक माने यांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. दीड किलोमीटपर्यंत ट्रकचा पाठलाग सुरू होता.
याचदरम्यान पोलीस अधिकारी माने यांनी स्वत:जवळील पिस्तुलातून ट्रकच्या चाकावर गोळीबार करून चाक निकामी केले. त्यानंतर ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले. हा ट्रक उरण जेएनपीटी येथे जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस रात्री उशिरापर्यंत ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम करीत होते.