ट्रकचा टायर पंक्चर झाल्याने गोंधळ
जोगेश्वरीच्या जेव्हीएलआरजवळ ट्रक पंक्चर झाल्याने सोमवारी पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली. सकाळी साडेआठच्या सुमारास हा ट्रक बिघडल्यामुळे दहिसरहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या बोरिवली ते जोगेश्वरीपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यातच सकाळी पश्चिम रेल्वे मार्गावर गोंधळ झाल्याने रस्ते माग्रे जाणाऱ्या नोकदार वर्ग आणि विद्यार्थ्यांचेही चांगलेच हाल झाले.
पश्चिम द्रुतगती मार्ग हा जलद मार्ग म्हणून ओळखला जातो. मात्र सोमवारी या जलद मार्गाला ब्रेक लागला होता. जेव्हीएलआर येथे अचानक ट्रक बंद पडल्याने बोरिवलीहून विलेपाल्रेच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. बिघाड झालेला ट्रक काही वेळात रस्त्यावरून बाजूला नेण्यात आला. परंतु, त्यानंतही वाहतूक कोंडीचा परिणाम दिसून आला. असला तरी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत वाहतूक विस्कळीत होती. रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू असल्याने पश्चिम द्रुतगती मार्गावर अतिरिक्त ताण आल्याचे सांगितले जात होते.
या कोंडीचा फटका सकाळी कामावर निघालेल्यांसह विद्यार्थ्यांनाही बसला. परीक्षाकेंद्रावर पोहोचण्यास विलंब झाल्याने अनेक विद्यार्थी हतबल झाले होते. परंतु, पश्चिम रेल्वेवरील गाडय़ांच गोंधळ आणि द्रुतगती महामार्गावरील कोंडी पाहून उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ देण्यात आला. वाहतूक कोंडीचे पडसाद समाजमाध्यमांतूनही दिसून आले. क्षुल्लक घटनेमुळे वाहतूक कोंडी होते आणि त्याचा हजारो प्रवाशांना त्रस होतो, यावर नेटकरींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.