नव्या वर्षांत पोलिसांकडे २२० ई-चलन यंत्रे

मंदिराच्या दानपेटय़ांपासून ते पायथ्याशी असलेल्या हारवाल्यापर्यंत आता सगळेच व्यवहार रोकडरहित (कॅशलेस) सुरू झाल्याने १ जानेवारीपासून मुंबई वाहतूक पोलिसांनीही दंडवसुलीची प्रक्रिया ‘कॅशलेस’ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षांत मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताब्यात २२० ई-चलन यंत्रे येणार आहेत. त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना डेबिट, क्रेडिट कार्डाद्वारेही दंड भरता येणार आहे.

येत्या १ जानेवारीपासून मुंबई वाहतूक पोलिसांनी रोखविरहित व्यवहारांच्या दृष्टीने एक पाऊल टाकण्याचे ठरविले आहे. त्यासाठी मुंबई शहर व उपनगरांत वेगवेगळ्या ठिकाणी ई-चलन यंत्रे बसविण्यात येणार आहेत. या ई-चलन यंत्रात डेबिट कार्ड ‘स्वाइप’ करण्याचीही सोय असणार आहे. ५०० पैकी २२० यंत्रांचे वाटप झालेले आहे. त्यामुळे या यंत्राच्या साहाय्याने नियम मोडणाऱ्या वाहनचालकाच्या ‘डेबिट कार्ड’च्या साहाय्याने दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल. जर एखाद्या वाहनचालकाकडे दंडाची रक्कम भरण्यास कार्ड नसेल तर तो वाहनचालक वोडाफोनच्या केंद्रात जाऊन पैसे भरू शकतो असेही पोलिसांनी सांगितले.सध्या ३४ पैकी २१ केंद्रांवर २२० ई-चलनाची यंत्रे देण्यात आली आहेत. कुलाब्यात २० तर इतर ठिकाणी दहा यंत्रे देण्यात आली आहेत. अन्य यंत्रांचे वाटपही लवकर करण्यात येईल. येत्या काही दिवसांत संपूर्ण मुंबईत आणखी २८० यंत्रे वाहतूक पोलिसांच्या सेवेत दाखल होतील, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

वाहन परवाना जप्ती बंद

दंडाची रक्कम न भरणाऱ्या वाहनचालकांचा वाहन परवाना वाहतूक पोलिसांकडून जप्त करण्यात येत होता. मात्र लवकरच या पद्धतीला पूर्णविराम देण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. वाहनचालकाची पूर्ण माहिती आणि केलेल्या गुन्ह्य़ांची माहिती पोलिसांकडे असल्याने हा निर्णय घेण्यात येणार आहे.