स्थानक परिसरातील फेरीवालामुक्तीचा परिणाम

दादर, बोरिवली, मालाड अशा महत्त्वाच्या व गर्दीच्या रेल्वे स्थानकांचा परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन बेस्ट प्रवाशांचा प्रवासासाठीचा वेळ वाचू लागला आहे. कोंडी कमी झाल्याने कुठे १० तर कुठे थेट २० मिनिटांपर्यंत वेळेची बचत होऊ लागल्याने केवळ प्रवाशीच नव्हे तर बेस्टचे चालक-वाहकही समाधान व्यक्त करत आहेत. केवळ प्रवासाचा नव्हे तर बेस्टच्या इंधनातही यामुळे मोठी बचत होत असल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली.

केवळ खासगी वाहनचालक, रिक्षा वा टॅक्सीचालकच नव्हे तर बेस्टच्या चालकांनाही फेरीवाले आणि त्यांच्याकडील वस्तू खरेदी करण्यासाठी घोळका करून उभे राहणारे खरेदीदार यांच्या गर्दीचा मोठा त्रास होतो असे. खासकरून दादरसारखे मध्यवर्ती स्थानक तसेच पश्चिम रेल्वेला समांतर जाणारा वीर सावरकर मार्ग फेरीवाल्यांमुळे गजबजून जात असे. परंतु स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना हटविल्याने इथले रस्ते मोकळे झाले आहेत. परिणामी वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासासाठीचा वेळ वाचू लागला आहे.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला. मनसेने फेरीवाल्यांविरोधात आघाडी उभारल्यानंतर पालिका आणि रेल्वेने फेरीवाल्यांवरील कारवाई गांभीर्याने घेत बहुतेक सर्वच रेल्वे स्थानक फेरीवालामुक्त केले. त्यामुळे रेल्वे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची वाट तर मोकळी झालीच, शिवाय बेस्टच्या चालकांना व प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळतो आहे.

मुंबईत धावणाऱ्या अनेक फेऱ्या स्थानक परिसरातूनही होतात. फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे बेस्टच्या बसगाडय़ांना वाट काढताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असे. जवळच्या पल्ल्याच्या बेस्टना दहा ते पंधरा मिनिटे तर लांबच्या पल्ल्याच्या गाडय़ांना अध्र्या तासाहून जास्त वेळ लागत असे. पण, आता रस्ते मोकळे झाल्याने वाहतूक कोंडीमुळे स्थानकापासून चालविल्या जाणाऱ्या बसगाडय़ांचा वेळ वाचू लागला आहे.

‘स्थानक परिसरातील फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या गर्दीतून मार्ग काढताना नाकीनऊ येत असे. आता रेल्वे परिसर मोकळा झाल्याने वेळ वाचू लागला आहे. गोराई ते माहीम प्रवासात बोरिवली आणि अंधेरी स्थानक परिसरातून जावे लागते. या परिसरातून फेरीवाले हटविण्यात आल्याने गोराई ते माहीम प्रवासातील १५ ते २० मिनिटांची बचत झाली आहे,’ असे गोराई आगार ते माहीम मच्छीमार कॉलनी दरम्यान बेस्ट बस चालवणारे सागर शिंदे यांनी सांगितले.बोरिवलीतील शांती आश्रम ते बोरिवली स्थानक मार्गे दहिसर कांदरपाडय़ापर्यंत बस चालवणारे बेस्टचे चालक चंद्रकांत देशमुख यांनीही रस्ते मोकळे झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

बेस्ट प्रवासासाठीचा आणि पर्यायाने प्रवाशांचा बराचसा वेळ वाचू लागला आहे. प्रवाशांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर बेस्टला लागणाऱ्या इंधनातही बचत होऊ लागली आहे.

हनुमंत गोफणे, बेस्ट, जनसंपर्क अधिकारी

मी गोरेगाव फिल्म सिटीमधे कामाला आहे. त्यामुळे दररोज फिल्म सिटी ते गोरेगाव स्थानकादरम्यान  बेस्ट बसने प्रवास करावा लागतो. पूर्वी स्थानक परिसर फेरीवाल्यांनी अडवल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन या प्रवासाला विलंब होत होता. यातून आता सुटका झाली आहे. रेल्वे स्थानक परिसर मोकळा झाल्याने चालण्यासाठीही जागा मोकळी मिळाली.

हेमराज गावीत, प्रवासी