मुंबईतील रस्त्यांवर वाहनांची गर्दी; अत्यल्प पावसातही प्रवाशांचा खोळंबा

मुंबईतील रस्त्यांवरील वाहनांची संख्या आणि रस्त्यांची लांबी यांच्यातील व्यस्त प्रमाण बुधवारी मुंबईकरांवर चांगलेच उलटले. बुधवारी दिवसभर मुंबईतील अनेक रस्त्यांवर कोणत्याही ठोस कारणाशिवाय वाहतूक कोंडी होती. शहर व उपनगरांमधील सर्वच प्रमुख भागांमध्ये गाडय़ांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या.

मुंबईतील रस्त्यांच्या लांबीच्या तुलनेत मुंबईच्या रस्त्यांवर दर दिवशी धावणाऱ्या वाहनांची एकत्रित लांबी जास्त असल्याचा निष्कर्ष अनेकदा काढला जातो. हा निष्कर्ष किती खरा आहे, याचे प्रत्यंतर मुंबईकरांना बुधवारी आले. लाल बहादूर शास्त्री मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, पश्चिम द्रुतगती मार्ग, लिंकिंग रोड, पूर्व द्रुतगती मार्ग, शीव-पनवेल महामार्ग, अंधेरी-घाटकोपर मार्ग, कुर्ला-अंधेरी मार्ग अशा मुंबईतील सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. बुधवारी पावसाचा जोरही फारसा नव्हता. तसेच मुंबईतील खड्डय़ांच्या संख्येतही या एका दिवसात वाढ झाली नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी कशामुळे झाली, याचा उलगडा होत नव्हता.

उपनगरांमधील रस्त्यांप्रमाणे दक्षिण मुंबईतही डी. एन. मार्ग, मंत्रालयासमोरील रस्ता, गिरगावातील रस्ते, मेट्रो परिसर, महापालिका मार्ग, महात्मा फुले मंडई, जे. जे. उड्डाणपूल, पी. डिमेलो मार्ग आदी मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होती. आझाद मैदानात रिपब्लिकन पक्ष, बहुजन समाज पार्टी आदी पक्षांचा मोर्चा आल्यानेही या कोंडीत भर पडली.

रस्त्यावरील वाहनांच्या घनतेचा प्रश्न

याबाबत अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिटय़ूटचे पंकज जोशी म्हणाले, ‘कोणत्याही रस्त्यावर किती वाहने जातात, यावरून रस्त्यावरील वाहनांची घनता ठरते. या घनतेवरून रस्त्यांची श्रेणी ठरवली जाते. सध्या मुंबईतील रस्ते ‘ड’ किंवा ‘ई’ एवढय़ा खालच्या श्रेणीत मोडले जातात. ‘ड’ श्रेणीतील रस्त्यांवर अत्यंत कूर्मगतीने वाहने जातात, तर ‘ई’ श्रेणीतील रस्त्यांवरील वाहतूक थांबून थांबून होते, एवढी त्या रस्त्यांवरील वाहनाची घनता जास्त असते. अनेकदा मुंबईतील वाहतूक ‘फ’ श्रेणीतही मोडते. रस्त्यावर वाहने एकाच जागी अडकून पडल्यास वाहनांची घनता ‘फ’ श्रेणीची ठरते.’ यावर उपाय करण्यासाठी वाहन नोंदणी किंवा नवीन इमारत बांधताना परिसरातील रस्त्यांची वाहन घनता किती आहे, याचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.