मेट्रो आणि रस्त्यांच्या कामांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण

मेट्रो रेल्वे आणि पालिकेच्या रस्ते कामांमुळे दक्षिण मुंबईमध्ये नाकाबंदी झाली असून दक्षिण मुंबईमधून कुलाबा, नरिमन पॉइंट परिसरात जाण्यासाठी वाहनचालकांना द्राविडी प्राणायाम घडत आहे. तर रस्ते कामांमुळे पादचाऱ्यांनाही अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आजही रस्ते खोदलेल्या अवस्थेत असल्यामुळे पावसाळ्यामध्ये नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

कुलाबा अथवा नरिमन पॉइंट परिसरात पोहोचण्यासाठी दक्षिण मुंबईमधून जावे लागते. पश्चिम उपनगरांमधून रेल्वेने चर्चगेटपर्यंत येणाऱ्या प्रवाशांना नरिमन पॉइंट गाठताना मध्येच सुरू असलेल्या मेट्रो कामांचा अडथळा पार करत जावे लागते. तर कुलाबा परिसरात जाताना मुंबई विद्यापीठाजवळून जाताना पालिकेच्या रस्ते कामामुळे तारेवरची कसरत करावी लागते. पूर्व उपनगरांमधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये उतरून कुलाबा अथवा नरिमन पॉइंट परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना अशाच अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे.

पालिकेच्या रस्ते विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आसपास असलेल्या के. बी. पाटील रोड, महात्मा गांधी रोड आणि ए. एस. डिमेलो रोडच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. ही कामे मे अखेपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र जून महिना उजाडला तरी ही कामे सुरूच आहेत. गेट वे ऑफ इंडियाजवळील हॉटेल ताजमहालसमोरील समुद्रालगतच्या पी. जे. रामचंदानी आणि हॉटेलच्या पाठीमागचा मेरी वेदर रोडच्या दुरुस्तीचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्याशिवाय बॉम्बे हॉस्पिटल रोडचे कामही सुरूच आहे. या परिसरात कामानिमित्त जाणाऱ्या मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. पावसाळा सुरू होण्याच्या बेतात असतानाही येथील रस्ते अद्यापही खोदलेल्या अवस्थेतच आहेत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाता-येता होत असलेल्या असुविधेमुळे काही ज्येष्ठ न्यायमूर्तीनी रस्ते कामांबद्दल पालिकेकडे तीव्र शब्दात नाराजीही व्यक्त केली आहे. काही रस्त्यांच्या निम्म्या भागाचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. तर निम्मा भाग खोदून ठेवण्यात आला आहे. हा निम्मा भाग समतोल करणे गरजेचे आहे. अन्यथा पाणी तुंबून नव्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

या रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या रस्त्यांवरील मलनिस्सारण वाहिन्यांची कामे पूर्ण झाली असून येत्या तीन-चार दिवसांमध्ये या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामही पूर्ण होतील.

विनोद चिठोरे, प्रमुख अभियंता, रस्ते