दुरुस्तीच्या कामामुळे तीन दिवसांपासून वाहतूक विस्कळित
कलानगरच्या प्रबोधनकार ठाकरे उड्डाणपुलावर तीन दिवसांपासून वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. कलानगर जंक्शन येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम सुरू केल्याने पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली असून, प्रबोधनकार ठाकरे उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबच-लांब रांग लागल्या होत्या. यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या अनेकांची विमाने चुकल्याने त्यांनी समाजमाध्यमांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. दरम्यान या कामाबद्दल वृत्तपत्रातील जाहिराती आणि सूचनाफलकाद्वारे पूर्वसूचना देण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.
प्रबोधनकार ठाकरे उड्डाणपुलावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली वाहतूक कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली. सार्वजनिक बांधकाम विभागाने कलानगर जंक्शन येथे दिवसा दुरुस्तीचे काम सुरू केल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र रात्री करायची कामे दिवसा सुरू केल्याने हा गोंधळ उडाला. तसेच याबद्दल वेळीच सूचित न केल्याने आमची अडवणूक झाली असा आरोप येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी केला. यासाठी २०० वाहतूक पोलीस बंदोबस्तासाठी येथे तैनात करण्यात आले होते.
शुक्रवारी जास्तच गोंधळ झाल्याने कलानगर ते दहिसर या मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली होती. सोमवारी सकाळी हे काम संपणार असल्याचे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र या वाहतूक कोंडीमुळे विमानतळ व दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना किमान तीन तास ताटकळावे लागले. या कोंडीचा घोळ संपतो न् संपतो तोच रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास या उड्डाणपुलावर एक गाडी बंद पडली होती. त्यामुळे माहीम कॉजवेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे अंतर गाठण्यासाठी वाहनांना ४० ते ४५ मिनिटे लागत होती.
प्रवाशांचे हाल
कलानगर जंक्शन येथे काम सुरू करण्यात येत असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. या कामाच्या जाहिराती वृत्तपत्रात देण्यात आल्या होत्या. तसेच ठिकठिकाणी सोयीसाठी वाहतूक वळवण्यात आली होती, असे वरिष्ठ वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, प्रवाशांचे हाल झाले.