गाडय़ांना दोन ते पाच तास उशीर; वेळेवर घरी पोहोचण्यासाठी वाहतुकीचे विघ्न

मुंबई, पुणे व अन्य भागांतून गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा संपूर्ण वेळ प्रवासातच जाणार असल्याने गणपतीसाठी वेळेवर घरी पोहोचू की नाही, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या गाडय़ांबरोबरच गणेशोत्सवासाठी विशेष गाडय़ाही मोठय़ा संख्येत सोडण्यात आल्या आहेत. या सर्व गाडय़ा दोन ते पाच तास उशिराने धावत आहेत. या गाडय़ांमुळे कोकण रेल्वे मार्ग ‘ब्लॉक’ झाला आहे.

गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येत प्रवासी कोकणात जातात. स्वस्त आणि वेळेवर होणाऱ्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडला जातो. त्यामुळे गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेवर प्रचंड गर्दी होते. मध्य व पश्चिम रेल्वे तसेच कोकण रेल्वेकडून विशेष गाडय़ा सोडल्या जातात, परंतु त्यामुळे कोकण रेल्वेवरील सर्वच गाडय़ांचा वेग मंदावतो. गाडय़ा उशिराने धावत असल्याने खेड, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, करमाळीपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गेल्या वर्षी २३८ विशेष गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. कोकण रेल्वेचा मार्ग अद्यापही दुहेरी नाही. त्यामुळे गणपतीत जादा गाडय़ा सोडल्या की संपूर्ण मार्गावर कोंडी होत आहे.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला), पनवेल, वांद्रे, पुणे येथून नियमित गाडय़ांसह विशेष गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत.
  • गुरुवारी पनवेलहून सुटलेली मंगला एक्स्प्रेस तब्बल चार ते पाच तास उशिराने धावत होती.
  • मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी मुंबईतून सुटणारी मांडवी एक्स्प्रेसही दोन तास उशिराने धावली.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमाळी विशेष गाडीही खूप उशिराने धावली.
  • अनेक गाडय़ा उशिराने धावत असून गणपतीसाठी वेळेवर घरी पोहोचू का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विशेष गाडय़ांचे प्रमाण अधिक असून त्याबरोबरच नियमित गाडय़ाही आहेत. या सगळ्याचा परिणाम रेल्वे मार्गावर होतो. नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार या गाडय़ा उशिराने धावत असल्या तरी हा उशीर खूप नाही. सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असून जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.  – एल. के. वर्मा , कोकण रेल्वे जनसंपर्क अधिकारी