वाहतूक कोंडी, पूलबंदी, मेट्रो कामे यामुळे होणाऱ्या ‘बस’कोंडीवर तोडगा; मात्र स्वतंत्र मार्गिकेविषयी वाहतूक पोलीस साशंक

मेट्रो प्रकल्पाची कामे, एकाच वेळी बंद करण्यात आलेले अनेक पूल यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत बसगाडय़ा अडकल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बेस्टच्या बससाठी स्वतंत्र मार्गिकेचा प्रयोग पुन्हा राबवण्याचा विचार बेस्ट व्यवस्थापनाने सुरू केला आहे. बेस्ट समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाने याबाबत अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले; परंतु आधीच मेट्रोच्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले असताना बेस्टच्या स्वतंत्र मार्गिकेमुळे खासगी वाहनांच्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रवाशांच्या घटत्या संख्येमुळे बेस्ट उपक्रम आधीपासून आर्थिक संकटात आहे. त्यातच बेस्टच्या बसगाडय़ा वाहतूक कोंडीत अडकत असल्यामुळे एकूण प्रवासास विलंब होत आहे. सध्या मुंबईत ठिकठिकाणी पुलांची, रस्त्यांची तसेच मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व बेस्ट बसगाडय़ांना लागणारा वेळ याबाबत मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा झाली. समितीतील भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी हरकतीचा मुद्द आहेत. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व बेस्ट बसगाडय़ांना लागणारा वेळ याबाबत मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा झाली. समितीतील भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून बेस्टचे अनेक मार्ग वळवण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे इंधनाचा खर्च वाढण्यासह प्रवासीही कमी झाले आहेत. परिणामी बेस्टला नुकसान होत असल्याचे सांगितले. वळवण्यात आलेल्या मार्गावरील बेस्टची वाहतूक पूर्ववत करून बेस्टचे प्रवासी मिळवण्याचा प्रयत्न करा, अशी मागणी गणाचार्य यांनी केली, तर शिवसेनेचे अनिल कोकीळ यांनी होणाऱ्या नुकसानीमुळे मेट्रो, पालिका व राज्य सरकारकडे बेस्टने नुकसानीची मागणी करावी, असे सांगितले. सदस्यांच्या या मागणीवर बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी बेस्टचा प्रवास सुकर करण्यासाठी स्वतंत्र मार्गिकेची आखणी केली जाणार असल्याचे सांगितले. त्यासाठी वाहतूक पोलिसांशीही चर्चा सुरू असून लवकरच अशा प्रकारची सुविधा सुरू केली जाईल, असे बागडे म्हणाले. शीव ते भायखळादरम्यान त्या परिसरातील मार्गावर एका मिनिटांत सुमारे १५० बस गाडय़ा धावतात; परंतु वाहतूक कोंडीसह अनेक कारणांमुळे त्या गाडय़ांना वेळ लागतो. स्वतंत्र मार्गिका सुरू झाल्यास हा प्रवास सुकर होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यांवर विकासकामे सुरू आहेत. या कामांसाठी मार्गरोधक उभे करण्यात आल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिका सुरू केल्यास इतर वाहनांच्या वाहतुकीसाठी रस्ता आणखी अरुंद पडू शकतो. त्यामुळे बेस्टच्या या मार्गिकेमुळे खासगी वाहनांच्या कोंडीत भर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वाहतूक कोंडी, पूलबंदी इत्यादीच्या कामांमुळे बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात बेस्ट प्रशासनासोबत चर्चाही करण्यात आली आहे. लवकरच त्याचा अहवाल सादर केला जाईल.    – मधुकर पाण्डेय, सहपोलीस आयुक्त, मुंबई वाहतूक पोलीस

जुहू एसएनडीटी येथील पूल, घाटकोपर लक्ष्मी बाग तसेच अंधेरीतील गोखले उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना बंदी आहे. त्यात बेस्टच्या बसगाडय़ाही येतात. या पुलांवरून जाणाऱ्या बेस्ट बस अन्य मार्गावरून वळवण्यात आल्याने बेस्टचे नुकसान होत आहे. उपक्रमाला दिवसाला किमान सहा ते सात लाख रुपये नुकसान होत असल्याचा अंदाज आहे.     – सुनील गणाचार्य, बेस्ट समिती सदस्य