20 November 2019

News Flash

‘पूलकोंडी’तून मुंबईकरांना तूर्त दिलासा नाहीच!

वाहतूक कोंडीबाबत माहिती देण्यासाठी ‘अ‍ॅप’ विकसित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वाहतूक कोंडीबाबत माहिती देण्यासाठी ‘अ‍ॅप’ विकसित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

शहरातील २९ पूल दुरुस्ती आणि पुनर्बाधणीसाठी बंद करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयामुळे शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि त्याचा मुंबईकरांना होणारा त्रास यावर उपाययोजना करण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झालेल्या बैठकीत ठोस तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे मुंबईकरांची ‘पूलकोंडी’ तूर्तास कायम राहणार असली तरी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनांमुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लागून असलेला हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने शहरातील जुने- धोकादायक पूल दुरुस्त करण्याची मोहीम हाती घेतली. पालिकेने शहरातील २९ पूल दुरुस्ती किंवा पुनर्बाधणीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेनेही १९९ पादचारी पूल आणि वाहतुकीच्या पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबईकरांना वाहतूक कोंडीच्या मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील सर्व यंत्रणांची बुधवारी बैठक बोलाविली होती. खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशीष शेलार, राज पुरोहित, अमित साटम, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, पोलीस आयुक्त संजय बर्वे, ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्यासह मध्य रेल्वेचे मंडल महाप्रबंधक संजयकुमार जैन आणि पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अनिल गुहा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबईत बांधण्यात येणारे पादचारी, वाहतूक आणि रेल्वे पुलांचे आयुष्यमान दीर्घकालीन असावे, यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करावा. सध्या ज्या भागातील पूल, रस्ते वाहतुकीस बंद आहेत त्याबाबत व पर्यायी मार्गाची माहिती देण्यासाठी मोबाइल अ‍ॅप तयार करण्याच्या सूचना फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या. नव्याने बांधण्यात येणारे पूल अधिक काळ टिकतील, अशी त्यांची रचना करावी आणि त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घ्यावी, असेही त्यांनी या वेळी सुचविले.

ज्या भागात ठरावीक बाजारपेठेच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते तेथे ठरावीक अंतरावर वाहनतळाची व्यवस्था करावी. तेथून नागरिकांना बाजारपेठेत जाण्यासाठी पर्यायी वाहतुकीची सुविधा निर्माण करावी. गर्दीच्या ठिकाणी खासगी वाहनांना प्रवेश देऊ नये, आवश्यकता भासल्यास ‘बेस्ट’ बसच्या प्रवासात सवलत देण्याचा विचार करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.

मुंबईत एकूण ३४४ पूल असून, त्यातील ३१४ पूल मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत आहेत तर ३० पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहेत. त्यातील २९ पूल संरचनात्मक परिक्षणानंतर बंद करण्यात आले आहेत. ९२ पूल सुस्थितीत असून ११६ पुलांची किरकोळ दुरुस्ती करण्यात येत आहे. तर ६७ पुलांची मोठय़ा प्रमाणावर दुरुस्ती सुरू आहे. मध्य रेल्वेमार्फत १९९ पुलांचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

घाटकोपर आणि जुहू तारा रोड या दोन पुलांची आयआयटी आणि व्हीजेटीआयमार्फत पुनर्तपासणी करण्यात आली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यानंतर हे दोन्ही पूल वाहतुकीस खुले केले जातील, असा निर्णय या वेळी घेण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या सूचना

  • सध्या मुंबईतील जे रस्ते, पूल बंद करण्यात आले आहेत त्याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी जागोजागी मार्गदर्शक फलक लावावेत.
  • पुलाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार, याबाबते फलक लावावेत.
  • दुरुस्तीमुळे ज्या पुलावरून अथवा रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे, त्याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी त्वरित मोबाईल अ‍ॅप विकसित करावे.

First Published on June 13, 2019 1:13 am

Web Title: traffic jam devendra fadnavis
Just Now!
X