दादरच्या टिळक पुलावर ट्रॉलीचे चाक तुटल्याने तीन तास खोळंबा

गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुका आणि खरेदीसाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांच्या वाहनांची संख्या वाढल्याने संपूर्ण शहरात शनिवारी वाहतूक कोंडीचे चित्र होते. रविवारी याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक आहे.

गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवसच आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची लगबग वाढू लागली आहे. महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने सुट्टीचा मुहूर्त साधून अनेक मंडळांनी गणरायाच्या मूर्ती घेऊन जाण्यासाठी मूर्तिकारांच्या कार्यशाळेत एकच गर्दी केली. मोठय़ा संख्येने कार्यकर्ते, ढोल-ताशे, मूर्ती वाहून नेण्यासाठी ट्रॉली, ट्रक आणि टेम्पोही आणण्यात आले होते. दादर, चिंचपोकळी, करी रोड, भायखळा यासह मुंबईच्या अन्य भागांत हीच लगबग सुरू होती. मात्र आगमन मिरवणुका आणि मूर्ती वाहून नेण्यासाठी आणलेल्या मोठय़ा वाहनांमुळे शहराच्या बहुतेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली.

लालबाग परिसरात वाहतुकीचे नियमन करताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दादर येथील टिळक पुलावर गणपतीची मूर्ती वाहून नेणाऱ्या ट्रॉलीचे चाक तुटले. पुलावरच ही घटना घडल्याने दादरहून भायखळापर्यंत जाणाऱ्या वाहतुकीचे तीनतेरा वाजले. दादर ते भायखळ्यापर्यंत बेस्ट बस, टॅक्सी आणि खासगी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. परिणामी शिवाजी पार्क, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन पुलावर वाहनांची कोंडी झाली. ती साधारण तीन तासांनी कमी झाली.

वरळी, बोरीवलीतील देवीदास लेन, एलटी रोड, खार, सांताक्रुझ, ग्रॅण्ट रोड परिसरातही दुपारी काळी वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मेट्रोच्या कामांमुळे अनेक ठिकाणचे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळेही वाहतूक कोंडीची तीव्रता वाढली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आणि गणेशोत्सवाची खरेदी करणाऱ्यांसाठी ९ सप्टेंबर हा शेवटचा रविवार मिळत असल्याने दुपारनंतर सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडीची दाट शक्यता आहे.

आजही कोंडीची भीती

वरळी, बोरीवलीतील देवीदास लेन, एलटी रोड, खार, सांताक्रुझ, ग्रॅण्ट रोड परिसरातही दुपारी काळी वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मेट्रोच्या कामांमुळे अनेक ठिकाणचे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळेही वाहतूक कोंडीची तीव्रता वाढली. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. रविवारीही नागरिक मोठय़ा प्रमाणावर खरेदीसाठी बाहेर पडणार असल्याने वाहतूक कोंडीची शक्यता आहे.