|| संजय बापट

८००० कोटी रुपये खर्चून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाचे आधुनिकीकरण

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जीवघेण्या वाहतूक कोंडीतून मुंबईकर लवकरच मोकळा श्वास घेणार आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावरील शीव ते ठाणे आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वांद्रे ते दहिसर चेक नाका दरम्यान होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या दोन्ही मार्गांचे आधुनिकीकरण आणि सहा मार्गिकांचा उन्नत महामार्ग बांधण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यासाठी सुमारे आठ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून हायब्रीड अ‍ॅन्युइटीअंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

मुंबई महानगर प्रदेशातील लोकांना दक्षिण मुंबईत येण्यासाठी पनवेल-सायन मार्गासोबतच वांद्रे- दहिसर चेक नाका हा पश्चिम द्रुतगती आणि शीव-ठाणे हा पूर्व द्रुतगती महामार्ग महत्त्वाची भूमिका बजावत असतो. पश्चिम द्रुतगती महामार्गावर दररोज सव्वातीन लाख तर पूर्व द्रुतगती महामार्गावर दररोज सुमारे तीन लाख वाहनांची वर्दळ असते. मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-नाशिक महामार्गावरील सर्व वाहतूक या दोन्ही द्रुतगती महामार्गावरूनच होते. शिवाय मुंबईकरांनाही या दोन मार्गाशिवाय अन्य किफायतशीर पर्याय नाही. दक्षिण मुंबईकडे येण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागत असल्याने पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील तासंतासांची श्वास कोंडणारी वाहतूक कोंडी मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजलेली असते.

मात्र आता या समस्येतून लोकांची सुटका होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे आठ हजार कोटी रुपये खर्चून या दोन्ही मार्गाच्या सुदृढीकरणाबरोबरच त्यावर उन्नत महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. स्तूप कंन्सल्टंट यांनी या दोन्ही महामार्गाच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प आराखडा तयार केला असून सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्तरावर या प्रकल्पाची छाननी सुरू आहे. ‘हायब्रीड अ‍ॅन्युइटी’अंतर्गत हा प्रकल्प करण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका असून याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणार असल्याचेही उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

  • पश्चिम द्रुतगती महामार्गावर माहीम जंक्शन ते दहिसर चेकनाका दरम्यान २४.८९ किमी मार्गाचे सृदृढीकरण करण्यात येणार असून तेथे दोन्ही दिशेला पाच मार्गिका तसेच सेवा रस्ता असेल.
  • याच मार्गावर खेरवाडी जंक्शन ते दहिसर दरम्यान २०.६५ किलोमीटर लांबीचा दोन्ही दिशेला तीन मार्गिका असलेला उन्नत महामार्ग बांधण्यात येणार आहे.
  • या मार्गावर दत्तपाडा, आरे उड्डाणपूल आणि विमानतळ जंक्शन तेथे उन्नत मार्गावर ये-जा करण्यासाठी सुविधा असेल.
  • या मार्गासाठी चार हजार ९९३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
  • आधुनिकीकरणानंतर या मार्गावरून दररोज सात लाख वाहनांची वेगात वर्दळ होऊ शकेल.
  • तर पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव जंक्शन ते गोल्डन डाईज नाका ठाणे या २३ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे तीन हजार ७० कोटी रुपये खर्चून आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
  • सध्याच्या मार्गावर दोन्ही दिशेला पाच मार्गिका तसेच सेवा रस्ता असेल. याच मार्गावर दोन्ही दिशेला तीन मार्गिका असणारा उन्नत महामार्ग असेल.
  • त्यावर जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड, अमर महल जंक्शन आदी ठिकाणी ये-जा करण्याची सुविधा असेल.