सुहास जोशी

रस्तोरस्ती कोंडमारा

एस. व्ही. रोड

छोटय़ा मोठय़ा बाजारपेठा, पश्चिम उपनगरांतील रेल्वे स्थानकांपासून जवळ असल्यामुळे सतत वाहनांची वर्दळ, अंतर्गत भागाशी जोडणारे रस्ते आणि सध्या सुरू असलेली रस्ते तसेच मेट्रो प्रकल्पाची कामे या सर्वामुळे एस. व्ही. रोडवरील वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

दहिसर ते वांद्रा असा विस्तार असलेला एस. व्ही. रोड पश्चिम उपनगरातील अंतर्गत वाहतूकीसाठी लिंक रोड खालोखाल महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावर मालाड सम्राट थिएटर आणि कांदिवली या टप्प्यात सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असते. पुढे अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बाजारपेठेमुळे ही कोंडी वाढत जाते. त्यानंतरच्या टप्प्यात मेट्रोच्या कामामुळे कोंडीत भर पडते. मेट्रो २ बी ही मार्गिका डीएन नगरहून जुहू चौकातून डावीकडे गुलमोहर रस्त्याकडे वळते आणि मिठीबाई महाविद्यालयावरून एस. व्ही. रोडवर येते. या संपूर्ण मार्गावर दोन्ही बाजूला रस्ता रोधक असल्यामुळे उर्वरित रस्त्यावरून केवळ एकाच वाहनाला जाता येते. येथे तुलनेने वाहतूक मर्यादित आहे. मात्र, याच रस्त्यावर कूपर रुग्णालयदेखील आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्यास रुग्णांसाठी ते त्रासदायक ठरू शकते.

गुलमोहर रस्त्यावरून एस.व्ही. रोडवर मेट्रोची मार्गिका आल्यानंतर सांताक्रूझ आगारापासून वाहतूक कोंडीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. येथील रस्ता तुलनेने मोठा असला तरी या रस्ता रोधकांमुळे वाहतूक कोंडीला आमंत्रणच मिळते. याच मार्गावर नानावटी रुग्णालयदेखील आहे. कूपरप्रमाणेच रुग्णांसाठी येथे वाहतूक कोंडीचा फटका बसू शकतो. पार्ले स्थानकावरुन येणारा स्काय वॉक सध्या बंद केल्यामुळे यात पादचाऱ्यांचीदेखील भर पडते.

सांताक्रूझ स्थानकाहून आलेला रस्ता एस.व्ही. रोडला जेथे छेदतो तेथे पुन्हा वाहतूक कोंडी सुरू होते. याच भागातील शैक्षणिक संकुलाच्या वाहनांची येथे सतत वर्दळ सुरू असते. सध्या याठिकाणी मेट्रोची कामेही जोरात सुरू आहेत. त्यामुळे बांधकामाशी निगडीत वाहनांची वर्दळदेखील वाढती आहे. काही ठिकाणी रस्ता रोधकांची दिशा तिरकी असल्याने दुभाजकांजवळ जी रिकामी जागा असते, त्या ठिकाणी सर्रास पार्किंग केल्याचे दिसून येते. वांद्रा, खार रोड, सांताक्रूझ, विलेपार्ले या सर्व ठिकाणांहून जुहू समुद्रकिनारी जाणारे अनेक रस्ते एस. व्ही. रोडला छेदून जातात. त्यामुळे शनिवार-रविवारी  संपूर्ण परिसरालाच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

वांद्रे ते अंधेरी दोन तास

मेट्रोच्या कामामुळे एस. व्ही. रोड अरुंद झाल्यामुळे येथून प्रवासाचा वेळ वाढला आहे. वांद्रे ते अंधेरी हे सुमारे दहा किमीचे अंतर पार करण्यासाठी किमान दोन तास लागतात, अशी प्रतिक्रिया या परिसरातील रहिवासी रघुवीर कुल यांनी दिली. सध्या महापालिका धोकादायक पूल बंद करत असल्यामुळे मोठा वळसा घेऊन मार्ग काढावा लागतो. जुहू तारा मार्गावरील गझदरबंद नाल्यावरील एसएनडीटी लगतचा पूल धोकादायक म्हणून बंद करण्यात आला होता. आता तो सकाळी सात ते सांयकाळी सात या काळात खुला आहे, पण ती मुदत वाहनांच्या गर्दीची वेळ पाहता रात्री दहा वाजेपर्यंत वाढवावी लागेल, अशी मागणी करण्यात येत आहे.

‘कोंडमारा’ होतोय?

पूल बंद, रस्त्यांची कामे, मेट्रो उभारणी, अवैध पार्किंग, बेशिस्त वाहतूक अशा विविध कारणांमुळे बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेबाबतचा तुमचा अनुभव आम्हाला कळवा. आपले अनुभव, मते रविवार, १६ जूनपर्यंत आम्हाला ईमेल करा. वाचकांच्या निवडक अनुभवांना प्रसिद्धी दिली जाईल.

ईमेल: vachak.loksatta@