X

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर वाहतूक कोंडी

बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत

मुंबई – पुणे एक्स्प्रेस-वे वर वाहतूक कोंडी झाली आहे. बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. अमृतांजन पुलाजवळ कंटेनर बंद पडला होता. सोबतच गणपती सुट्टी असल्यामुळे अनेक चाकरमानी आपापल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर अमृतांजन पुलाजवळ कंटेनर बंद पडला होता. सकाळी ७ च्या सुमारास हा कंटेनर बंद पडला होता. याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील चाकरमानी आपापल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे एक्स्प्रेस-वे वर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी आहे. वाहतूक कोंडी झाल्याने अनेकजण अडकले आहेत. जवळपास तीन ते चार किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय, हे आहेत पर्यायी मार्ग

> मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून कोल्हापूरमार्गे रत्नागिरीसिंधुदुर्गकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

> रायगड जिल्ह्यात जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कळंबोली-पनवेल बायपास ते पळस्पे फाटा आणि मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरून खोपोली-पाली – वाकण मार्गाचा वापर करावा.

> रत्नागिरी व सिंधुदुर्गात जाणाऱ्या व चिपळूणला जाणाऱ्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-उंब्रज-पाटण- कोयना नगर- कुंभार्ली घाट मार्गे खेर्डी-चिपळूण रस्त्याचा वापर करावा.

> हातखंबा येथे जाणाऱ्यांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-कराड-वाठार-टोप-मलकापूर-शाहूवाडी- आंबाघाट मार्गे लांजा-राजापूर मार्गाचा वापर करता येईल.

> कणकवलीला जाणाऱ्यांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-कराड-कोल्हापूर शहरातून रंकाळा तलावावरून कळे-गगनबावडा घाट मार्गे वैभववाडी -कणकवली या मार्गाचा वापर करता येईल.

> मुंबईहून सावंतवाडीला जाणाऱ्या कोकणवासियांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-कराड-कोल्हापूर-निपाणी-आजरा-आंबोली घाट मार्गे सावंतवाडीला जाता येईल.

> आपातकालीन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांक ९८३३४९८३३४ व ९८६७५९८६७५ येथे संपर्क साधण्याचे आवाहन राज्य महामार्ग पोलिसांनी केले आहे.

First Published on: September 12, 2018 8:20 am