सायन- पनवेल महामार्गावरील खड्ड्यांनी वाहनचालक त्रस्त झाले असून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे खारघर ते सीबीडी दरम्यान भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. खारघर ते सीबीडी हे तीन किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने सकाळी खड्डे भरले देखील होते. मात्र, यानंतर आलेल्या पावसांत अवघ्या ५ ते १० मिनिटांमध्येच खड्डे भरण्यासाठी वापरलेले मटेरियल वाहून गेल्याची तक्रार वाहनचालक करत आहेत.

सायन – पनवेल महामार्गावर चालकांना रविवारी रात्रीपासूनच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. कोकण भवन समोरील उड्डाण पुलाच्या सुरुवातीलाच जोरदार पावसाने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आणि वाहतुकीचा वेग मंदावला. तीन किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागत असल्याने चालकांना मनस्तापाचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक होत होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता परिस्थितीची पाहणी करण्यास आले. त्यांनी खड्डे बुझवण्याचे काम वेगाने काम हाती घेतल्याचा देखावा उभा केला खरा पण खड्डा बुझवल्यावर अगदी पाच ते दहा मिनिटात खड्डे बुझवण्यासाठी वापरलेले मटेरियल वाहून जात होते, अशी तक्रार वाहनचालक संदीप पाटील यांनी केली.