X

किरकोळ अपवाद वगळता वाहतूक सुरळीत

सकाळी सव्वादहाच्या सुमारास भांडुप स्थानकात मनसे कार्यकर्त्यांनी रेल रोको केला.

८८२ जण ताब्यात, सहा अटकेत; बेस्टच्या १८ गाडय़ांचे नुकसान

मुंबई : शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ‘भारत बंद’ला प्रतिसाद मिळाला असला तरी सोमवारी शहरातील वाहतूक सुरळीत राहिली. मुंबईत तीन स्थानकांत रेल रोको व बेस्ट बसगाडय़ांवर दगडफेकीच्या तुरळक घटना वगळता शहर व उपनगरातील वाहतुकीला कोणताही धक्का लागला नाही. बेस्टच्या १८ बसगाडय़ांचे नुकसान झाले. राज्यात एसटीचीही वाहतूक ९० ते ९५ टक्के सुरळीत राहिली. दरम्यान, पोलिसांनी सोमवारी संध्याकाळपर्यंत ८८२ आंदोलकांना ताब्यात घेतले. यापैकी सहा जणांना अटक केली गेली आणि आठ गुन्ह्य़ांची नोंद करण्यात आली.

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानकात सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. सकाळी पावणेदहाच्या सुमारास सुरू झालेले आंदोलन १५ मिनिटे चालले. या वेळी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह अन्य नेते व पदाधिकारीही होते.

सकाळी सव्वादहाच्या सुमारास भांडुप स्थानकात मनसे कार्यकर्त्यांनी रेल रोको केला. दहा मिनिटांत पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करून लोकल पूर्ववत केली. घाटकोपर स्थानकातही आंदोलनाच प्रयत्न झाला असता पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनामुळे मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही. पोलीस प्रवक्ते मंजुनाथ सिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत शहरातील ९४ पोलीस ठाण्यांमध्ये ८८२ जणांना ताब्यात घेतले गेले. यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली तर एकूण ८ गुन्ह्य़ांची नोंद करण्यात आली.

दरम्यान, एसटीच्या २५० आगारातील ९० ते ९५ टक्के वाहतूक व्यवस्थित सुरू होती, अशी माहीती एसटी महामंडळाने दिली.

मेट्रो रेल्वे रोखण्याचा प्रयत्न

मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी पावणेदहाच्या सुमारास अंधेरी येथील मेट्रो-१च्या डी. एन. नगर स्थानकात घुसून घोषणाबाजी केली. त्यामुळे घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो-१च्या मार्गावरील मेट्रो सेवा काही कालावधीसाठी विस्कळीत झाली. सकाळी पावणेदहाच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनानंतर १० वाजता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मेट्रो सेवा सुरळीत झाल्याची माहिती मेट्रो-१च्या प्रवक्त्यांनी दिली.