प्रसाद रावकर

वाहतुकीत ठिकठिकाणी अडथळे; रस्त्यालगत वाहने उभी करण्यास मनाई करण्याची मागणी

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे मुंबईतील वाहतुकीचा वेग मंदावला असतानाच अनेक ठिकाणी रस्त्यालगत उभी करण्यात आलेली वाहने वाहतूक विस्कळीत करत आहेत. मेट्रोच्या प्रकल्पस्थळी वाहने उभी करण्यास मज्जाव करावा, अशी मागणी करत प्राधिकरणाने वाहतूक पोलिसांकडे बोट दाखवले आहे, तर काही ठिकाणी वाहने उभी करण्यास आधीच मनाई करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, यावर ठोस तोडगा काढण्यात न आल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

एमएमआरडीएच्या माध्यमातून ठिकठिकाणी युद्धपातळीवर ‘मेट्रो’चे जाळे उभारण्यात येत आहे. दहिसर (पूर्व) ते डी. एन. नगरदरम्यान ‘मेट्रो २ अ’, डी. एन. नगर ते मंडालेदरम्यान ‘मेट्रो २ ब’,  दहिसर ते अंधेरीदरम्यान ‘मेट्रो-७’, वडाळा ते कासारवडवलीदरम्यान ‘मेट्रो ४’ प्रकल्प उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. प्रकल्पाची कामे सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेची बाब म्हणून मार्गरोधक (बॅरिकेड) बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा मार्ग आकुंचन पावला आहे. असे असतानाही प्रकल्पाची कामे सुरू असलेल्या ठिकाणच्या समोरील पदपथालगत मोठय़ा प्रमाणावर  वाहने उभी करण्यात येत आहेत. रस्त्यालगत उभी असलेली वाहने आणि प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेले मार्गरोधक यामुळे रस्त्याचा बराच भाग अडला असून त्याचा फटका वाहतुकीला बसू लागला आहे. कार्यालयीन वेळांमध्ये सकाळी मोठय़ा संख्येने वाहने उपनगरांतून शहराच्या दिशेला येत असतात, तर संध्याकाळी रस्तेमार्गाने शहरातून उपनगरांकडे परतीचा प्रवास सुरू असतो. त्या वेळी या ठिकाणी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तासन्तास कासवगतीने वाहने चालवावी लागतात. वाहतूक कोंडी, वाहनांचा आवाज, उडणारी धूळ आदी समस्यांमुळे या परिसरात वास्तव्यास असलेले रहिवाशीही हैराण झाले आहेत.

वाहतूक कोंडीमुळे प्रवाशी आणि रहिवाशी यांना होणारा मनस्ताप लक्षात घेऊन एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासोबत गेल्या शुक्रवारी पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत वाचा फोडली. मेट्रोची कामे सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यालगत वाहने उभी करण्यास मनाई करावी, अशी मागणी आर. ए. राजीव यांनी या वेळी केली. वाहने उभी करण्यास मनाई केल्यास वाहतुकीसाठी मोठी जागा मोकळी होऊ शकेल आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंशी सुटेल, असा आशावाद त्यांनी या बैठकीत व्यक्त केला. मात्र प्रकल्पस्थळी वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली असून उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू असलेल्या ठिकाणी उभी करण्यात येणारी वाहने वाहतुकीसाठी त्रासदायक ठरू लागली आहेत. तेथे वाहने उभी करण्यास मनाई केल्यास वाहतुकीला अधिक जागा उपलब्ध होईल आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंशी सुटेल.

– आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

मेट्रोची कामे सुरू असलेल्या ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. तेथे वाहने उभी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते.

– सौरभ त्रिपाठी, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग (पूर्व उपनगरे)