20 January 2020

News Flash

आक्रसलेला ‘एलबीएस’!

येत्या पावसाळ्यात या सर्व त्रासात आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

(संग्रहित छायाचित्र)

सुहास जोशी

मेट्रो, सांडपाणी वाहिन्यांच्या कामांमुळे वाहनांना जेमतेम जागा

रस्तारोधकांमुळे निम्म्यावर आलेला चारपदरी मार्ग, पादचारी मार्गाचे आणि सांडपाणी वाहिन्यांचे काम यामुळे लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावरचा (एलबीएस) प्रवास म्हणजे निव्वळ रखडपट्टी ठरत आहे. कासारवडवली (ठाणे) ते वडाळा या मेट्रो-४ प्रकल्पाचे काम एलबीएसवर मुलुंड ते घाटकोपपर्यंत सुरू असल्याने अनेक ठिकाणी घाईगर्दीच्या वेळी वाहतुकीची चांगलीच कोंडी उडालेली असते. येत्या पावसाळ्यात या सर्व त्रासात आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जुना मुंबई-आग्रा महामार्ग म्हणून ओळखला जाणारा एलबीएस मार्ग मुलुंड, भांडुप, कांजुरमार्ग आणि घाटकोपर येथील नागरिकांच्या अंतर्गत वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. मेट्रोच्या कामासाठी उभारलेल्या रस्तारोधकांमुळे केवळ दोन छोटी वाहने किंवा एक मोठे वाहन जाण्याएवढीच जागा अनेक ठिकाणी शिल्लक राहिली आहे. विशेषत: नौदल कर्मचारी वसाहती ते जेव्हीएलआर जंक्शन आणि पुढे घाटकोपर आर मॉल आणि भांडुपचा काही भाग या मार्गावर तर एकच मोठे वाहन कसेबसे मार्गक्रमण करीत असते. तर भांडुपजवळील काही ठिकाणच्या अतिक्रमणांमुळे मुळातच अरुंद असलेला मार्ग मेट्रोच्या कामामुळे आणखी अरुंद झाला आहे. वाहतूक कोंडीबरोबरच अनेक ठिकाणी पादचारी मार्गाचे काम सुरू असल्याने पादचाऱ्यांनादेखील अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच कांजूरमार्ग येथे सांडपाणी वाहिनीचे कामदेखील सुरू असल्याने एकूणच पादचाऱ्यांसाठी हा रस्ता त्रासदायक ठरत आहे.

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाना जोडणाऱ्या जोगेश्वरी-विक्रोळी िलक रोडवर (जेव्हीएलआर) जाण्यासाठी कांजूरमार्ग सिग्नलला घाईगर्दीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यातच जेव्हीएलआरवर सध्या मेट्रो ६च्या कामासाठी रस्तारोधक लावलेले असल्याने तो रस्तादेखील अनेक ठिकाणी अरुंद झाला आहे.

गांधीनगर आणि भांडुप या पट्टय़ातील काही नागरिकांनी एकत्र येऊन वाहतूक कोंडी आणि इतर कामांमुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास याबाबत एमएमआरडीए, महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. ‘एरवी दोन कि.मी.चे अंतर पार करण्याकरिता १२-१५ मिनिटे लागायची, पण सध्या याच प्रवासासाठी ४० मिनिटे लागतात,’ अशी व्यथा कांजूरमार्ग येथील रहिवासी शिरीष दाऊदखाने यांनी मांडली. पावसाळ्यात हाच वेळ वाढण्याची शंका ते व्यक्त करतात. पावसाळ्यात जेथे काम बंद असेल त्या भागातील रस्तारोधके हटवावीत, पादचारी मार्गाचे काम लवकर संपवावे, आतील भागातील माती आणि कचरा दूर करावा, आदी मागण्यांसाठी दाऊदखाने यांनी अन्य नागरिकांसोबत अनेकदा एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. नऊ महिन्यांपासून सुरू असलेले हे काम संथगतीने होत असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास किती काळ सहन करायचा, असा प्रश्न या नागरिकांना पडला आहे. मेट्रो, पालिका, वाहतूक पोलीस या सर्व यंत्रणांनी नागरिकांशी एकत्रित संवाद साधावा आणि आमच्या अडचणी दूर कराव्यात, अशी या नागरिकांची मागणी आहे.

रस्तोरस्ती कोंडमारा

एकापाठोपाठ एक बंद करण्यात येत असलेले पूल, शहरभर सुरू असलेली मेट्रोची कामे, पावसाळय़ापूर्वीच्या कामांसाठी खोदलेले रस्ते अशा विविध कारणांमुळे मुंबईची रस्ते वाहतूक व्यवस्था सध्या बेजार झाली आहे. क्षमतेच्या किती तरी पट अधिक वाहनांचा भार झेलणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होणे नवीन नाही. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे मुंबईकरांचा अक्षरश: कोंडमारा होत आहे. हे चित्र मांडणारी विशेष वृत्तमालिका..

झाडांची दुरवस्था

रस्ता दुभाजकाच्या दोन्ही बाजूंस सुरू असलेल्या कामामुळे या दुभाजकावरील झाडांची दुरवस्था झालेली दिसते. झाडे तोडायची परवानगी मिळालेली नसल्याने अजून झाडांना हात लावला नसला तरी खांब उभे करण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी झाडांची मुळे वर आली आहेत. तर काही झाडे पूर्ण वाळून गेली आहेत.

मुंबई-ठाणे शहरांना जोडणाऱ्या एलबीएस मार्गावरील विविध कामांमुळे हा रस्ता अरुंद बनला आहे. परिणामी येथे सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येते.

First Published on June 7, 2019 1:10 am

Web Title: traffic on lbs road
Next Stories
1 शालेय बससाठी स्वतंत्र थांबे
2 डासांच्या भूमिगत उत्पत्तिस्थानांचा बंदोबस्त
3 वैद्यकीय पदवीची देशपातळीवर सामाईक परीक्षा हवी!
Just Now!
X