उत्कृष्ट पर्यावरण, फेरीवाला मुक्त पुरस्कारप्राप्त एन दत्ता मार्गावर बेकायदा पार्किंग
उत्कृष्ट पर्यावरणपूरक, एकाही फेरीवाल्याला थारा न देणारा रस्ता म्हणून पुरस्कृत झालेल्या अंधेरी पश्चिमेतील संगीतकार एन दत्ता मार्गावरील रहिवासी सध्या वाहतूक पोलिसांच्या असहकार्यामुळे कमालीचे हतबल झाले आहेत. आपला रस्ता चांगला व संरक्षित राहावा, यासाठी झटणाऱ्या या रहिवाशांच्या मागणीला तिलांजली देत वाहतूक पोलिसांनी स्कूल बसच्या बेकायदा पार्किंगबाबत बघ्याची भूमिका घेतली आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी सहकार्य नाही केले तरी वरिष्ठांपर्यंत तक्रारी नेऊन आपला लढा कायम ठेवण्याचा निर्धार या रहिवाशांनी व्यक्त केला आहे.
हा रस्ता आदर्श व्हावा, यासाठी एन दत्ता मार्ग पर्यावरणवादी गट गेल्या दहा-बारा वर्षांपासून कार्यरत आहे. या रस्त्यावर अनधिकृत वाहनाच्या बेकायदा पार्किंगला विरोध करून एक प्रकारे वाहतूक पोलिसांना हा गट मदत करीत असतो. या रस्त्याच्या एका बाजूला सम आणि विषम तारखेनुसार पार्किंग करता येते. अवजड वाहनांना या रस्त्यावर परवानगी नाही. तरीही गुड शेफर्ड चर्चच्या समोर असलेल्या मार्गावर एक स्कूल बस बेकायदा उभी केली जाते. त्यामुळे संबंधित बसच्या मालकाला रहिवाशांनी विनंती केली असता त्याने दादागिरी सुरू केली. त्यामुळे डी. एन. नगर वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भूषण राणे यांच्याकडे या गटाच्या अॅलेक्झांड्रिया अय्यर यांनी संपर्क साधला, परंतु त्यांनी दाद दिली नाही. अनेक रहिवाशांनी तक्रारी केल्या, परंतु त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. अखेरीस सहआयुक्त मिलिंद भारांबे यांच्या कानावरही ही बाब घालण्यात आली. त्या वेळी संबंधित नागरिकांनी हा प्रश्न विनाकारण प्रतिष्ठेचा केला आहे. दोन झाडांच्या मध्ये ही स्कूल बस उभी करण्यात येते. त्यामुळे वाहतुकीला काहीही अडथळा होत नाही, असे स्पष्ट करीत वरिष्ठ निरीक्षक राणे यांनी कारवाई करण्यास नकार दिला. त्यामुळे साहजिकच बसमालकाची हिंमत वाढली.
आता तो रात्रीच्या वेळी दोन-दोन स्कूल बस या मार्गावर उभ्या करू लागला आणि रहिवाशी हतबलपणे त्याकडे पाहात आहेत. या स्कूल बसच्या आड कुठला अनुचित प्रकार रात्रीच्या वेळी घडला तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल रहिवासी विचारीत आहेत. या स्कूल बस मालकापोटी डी. एन. नगर वाहतूक पोलिसांचे नेमके कुठले संबंध दडलेले आहेत, अशी विचारणा रहिवासी करीत आहेत. सहआयुक्तांनी तरी अशा वरिष्ठ निरीक्षकाला पाठीशी घालू नये, अशी मागणी हे रहिवासी करीत आहेत.

बेकायदा पार्किंगविरुद्धही कारवाई नाही!
या मार्गावर सम आणि विषम तारखेलाच पार्किंगची परवानगी आहे. परंतु ही स्कूलबस एकाच बाजूला उभी असते. अशा वेळी इतर गाडय़ा उचलणारे वाहतूक पोलीस या स्कूल बसकडे मात्र दुर्लक्ष करतात.

जनतेकडून सहकार्याची अपेक्षा करता मग आम्ही आमचा रस्ता संरक्षित करण्यासाठी जर एखादा प्रश्न प्रतिष्ठेचा केला तर काय बिघडले? उद्या बसच्या आड राहून शौचासाठी वापर करणे वा तत्सम बाबी होऊ शकतात. ती जबाबदारी कोणाची?
– अलेक्झांड्रीया अय्यर, एन. दत्ता एन्हायरोन्मेंटल ग्रुप.

रहिवाशांनी हा प्रश्न विनाकारण प्रतिष्ठेचा केला आहे. एक स्कूल बस उभी राहिली तर काय बिघडले? त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत नाही. अशा वेळी कारवाई कशी करणार?
– भूषण राणे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डी. एन. नगर वाहतूक पोलीस.