शुल्क आकारून व्यवस्था पुरवण्याची वाहतूक पोलिसांची सूचना

मुंबई : शहरातील बडे मॉल, शॉपिंग सेंटरने सोमवार ते शुक्रवार या काळात ग्राहकांव्यतिरिक्त इतर वाहनांना आपल्या वाहनतळाचा उपयोग करू द्यावा, अशा सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत. ही सूचना अमलात आल्यास वाहने उभी करण्यासाठी (पार्किंग) तोकडे पर्याय, कोंडी या अडचणी काही अंशी सुटू शकतील, असा दावा पोलिसांनी केला आहे.

गेल्या आठवडय़ात वाहतूक पोलीस दलाचे सहआयुक्त मधुकर पांडे यांनी शहरातील बडय़ा मॉलच्या व्यवस्थापनासोबत प्रदीर्घ चर्चा केली. या चर्चेत मोठे मॉल, मोठय़ा शॉपिंग सेंटरमध्ये (जेथे वाहनतळ उपलब्ध आहे) शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून एरव्ही वाहनतळाची साधारणपणे चाळीस टक्के जागा व्यापली जाते. उर्वरित जागा मोकळी राहते, हा मुद्दा पुढे आला. ही मोकळी जागा मॉलमध्ये आलेल्या ग्राहकांव्यतिरिक्त इतर वाहनांना उपलब्ध करून द्याव्यात. मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांकडून जे शुल्क आकारले जाते तितकेच शुल्क इतर वाहनांकडून आकारावे, अशी सूचना पांडे यांनी व्यवस्थापनांना केली. या वाहनतळांवर सोमवार ते शुक्रवार या काळात १२ ते १५ हजार वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न मार्गी लागू शकेल, असा विश्वास पांडे यांनी व्यक्त केला.

मॉलना सुरक्षेची भीती

वाहतूक पोलिसांच्या सूचनेमुळे मॉल व्यवस्थापन चिंतेत आहेत. ही सूचना मान्य केल्यास मॉलमध्ये सुरक्षेचा प्रश्न उद्भवेल, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, वाहनतळाचा गैरवापर ग्राहकाच्या वेशात आलेली व्यक्तीही करू शकते, असे सांगत पोलिसांनी ही शंका खोडून काढली आहे. शासकीय-खासगी वाहनतळांच्या तुलनेत मॉलमधील वाहनतळांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. प्रत्येक मॉलच्या वाहनतळांवर सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत, असे वाहतूक दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्याच वेळी अशा प्रकारची सुविधा देऊन मॉल व्यवस्थापनांना चांगला महसूल मिळू शकेल, असा दावाही करण्यात येत आहे.