चौकशीआधीच पालिका प्रशासनाचा शेरा

मुंबई : प्रिन्स राजभर या बालकाबाबत घडलेली दुर्घटना हा अपघात होता, असा शेरा या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्याआधीच पालिका प्रशासनाने दिला आहे. या मुद्दय़ावरून शुक्रवारी स्थायी समितीत सर्व पक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

या मृत्यूबाबत प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी सभागृहात निवेदन केले. प्रिन्सला दाखल करण्यात आले तेव्हा त्याचे वजन अतिशय कमी म्हणजे अडीच किलो होते. नंतर डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्याचे वजन वाढत होते. तसेच, प्रिन्ससाठी लावण्यात आलेले ईसीजी मशीन सुस्थितीत होते, असा खुलासाही त्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल हे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या खुलाशावर सर्व पक्षीय सदस्यांनी संताप व्यक्त केला. चौकशी सुरू असताना या दुर्घटनेला अपघाताचे नाव देणे योग्य नसल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते रवी राजा आणि समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी मांडला. निवेदनात प्रशासनाने प्रिन्सच्या मृत्यूचे नेमके कारण काय याचाही उल्लेख केला नसल्याचा मुद्दा रईस शेख यांनी मांडला. प्रिन्सच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी केली. ही चौकशी बाहेरच्या व्यक्तीमार्फत करावी, अशी मागणी सर्व सदस्यांनी केली. भारमल हे पालिकेचेचे डॉक्टर असल्यामुळे ते निष्पक्ष चौकशी करणार नाहीत, असा आरोपही सदस्यांनी केला. प्रिन्सच्या मृत्यूनंतर नुकसान भरपाई किती देणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर नुकसान भरपाई दहा लाख रुपयेच देणार असल्याचेही दराडे यांनी स्पष्ट केले.