पाच वर्षांत १८,४२३ जणांचा मृत्यू; रूळ ओलांडताना आणि लोकलमधून पडून सर्वाधिक दुर्घटना

मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर गेल्या पाच वर्षांत झालेल्या विविध अपघातांत १८ हजार ४२३ जणांचा बळी गेल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. यात सर्वाधिक अपघात रूळ ओलांडताना व लोकलमधून पडून झाले आहेत. अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करूनही रेल्वे मार्गावरील अपघातांचे सत्र थांबलेले नाही.

लोकलमधून पडून, रेल्वे रूळ ओलांडताना तसेच अन्य कारणांमुळे मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर हजारो जणांना प्राण गमवावे लागतात. रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अशी ठिकाणे शोधून तेथे उपाययोजनाही केल्या जात आहेत. मात्र त्याचा फायदा झालेला नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील शेख यांनी लोहमार्ग पोलिसांकडे २०१३पासून २०१८ (ऑगस्ट) पर्यंत मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर लोकलमधून पडून, रूळ ओलांडताना आणि अन्य कारणांमुळे झालेल्या अपघातांतील मृतांची व जखमींची माहिती मागितली होती. त्यांना मिळालेल्या माहितीत, १८ हजार ४२३ जणांनी प्राण गमावल्याचे स्पष्ट झाले आहे. १८ हजार ८४७ जण जखमी झाले नमूद करण्यात आले आहे. शेख यांनी सांगितले की, ‘मुंबई उच्च न्यायालयाने रुळांच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत बांधण्याचे आदेश दिले आहेत. परंतु रेल्वे प्रशासनाने याकडे लक्षच दिले नसल्याचे दिसते. त्यांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे.’

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने उपनगरीय रेल्वे मार्गावरील अपघात रोखण्यासाठी रेल्वे स्थानकांत सोयी-सुविधा देतानाच दोन स्थानकांदरम्यान रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठीही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. पादचारी पूल, भुयारी मार्ग यासह अन्य सुविधाही दिल्या जाणार आहेत. वारंवार अपघात होणारी ठिकाणेही एमआरव्हीसीकडून शोधण्यात आली आहेत. त्यामुळे अपघात कमी होतील, असा दावाही केला जात आहे.