मध्य, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना एकाचवेळी लाभ
उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या ८० लाख प्रवाशांना तातडीने आणि त्यांच्या सोयीने तिकिटे मिळावीत, यासाठी आवश्यक असलेली कागदविरहित तिकीट प्रणाली पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता सप्टेंबर अखेपर्यंत मध्य रेल्वेवरही सुरू होणार आहे. या प्रणालीद्वारे तिकिटांबरोबरच मासिक-त्रमासिक पासही मिळणार आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना आपल्या मोबाइलमध्येच पास बाळगणे सहज शक्य होणार आहे.
पश्चिम रेल्वेवर जुलै महिन्यात सुरू झालेली कागदविरहित मोबाइल तिकीट यंत्रणा मध्य रेल्वेवर ऑगस्ट महिन्यात सुरू होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या प्रणालीसाठी इस्रो रेल्वेचे नकाशे तयार करून देणार होती. मोबाइल तिकीट काढण्यासाठी रेल्वेमार्गापासून किमान १५ मीटर आणि कमाल दोन किलोमीटर अंतर असणे आवश्यक आहे. हे अंतर आखताना हार्बर आणि मुख्य मार्गावरील कमी अंतर आड येत होते. याबाबत सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिम (क्रीस) ही संस्था काम करत असून अखेर या प्रणालीच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
मध्य रेल्वेवर ही तिकीट प्रणाली लागू करताना केवळ कागद विरहित तिकिटे काढण्याची सोय देण्याऐवजी आम्ही प्रवाशांना पास काढण्याची सोयही देणार आहोत. मध्य रेल्वेबरोबरच ही कागदविरहित पास प्रणाली पश्चिम रेल्वेवरही लागू होणार आहे, अशी माहिती ‘क्रीस’चे मुंबईतील महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी दिली. कागदविरहित मासिक पास प्रणालीची चाचणी मध्य रेल्वेवर मंगळवारपासून सुरू झाली आहे. ही चाचणी येत्या पंधरवडय़ात संपेल. त्यानंतर या चाचणीच्या अहवालानुसार ऑक्टोबर महिन्यापासून मध्य रेल्वेवरही कागदविरहित तिकीट प्रणाली सुरू होईल, असे बोभाटे यांनी सांगितले.

कागदविरहित पास कसा काढाल?

प्रवाशांना स्मार्टफोनवर रेल्वेचे मोबाइल तिकीट अ‍ॅप असणे आवश्यक आहे. सोबत ‘आर वॉलेट’मध्ये पैसेही भरावे लागतील. प्रवासी त्यासाठी ऑनलाइन किंवा रेल्वेच्या तिकीट खिडकीचा आधार घेऊ शकतील. त्यानंतर आर वॉलेटमध्ये शिल्लक असलेल्या पैशांच्या आधारे मोबाइल तिकीट अ‍ॅपच्या माध्यमातून हे तिकीट काढता येईल. मात्र, याबाबतच्या अधिक स्पष्ट सूचना लवकरच दिल्या जातील.