मध्य रेल्वेवर ठिकठिकाणी रुळांवर पाणी; पश्चिम रेल्वेला अंशत: फटका

मुंबई : सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईतील उपनगरीय रेल्वेवाहतुकीवरही झाला. रुळांवर साचलेले पाणे, कोसळलेली झाडे, उडून रुळांवर पडलेले पत्रे अशा विविध कारणांमुळे दिवसभर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत होत असली तरी, त्या मार्गावरही काही घटनांमुळे वाहतुकीवर परिणाम झाला.

घाटकोपर ते विक्रोळीदरम्यान सकाळी ९.१०च्या सुमारास जोरदार वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या ओव्हरहेड वायर आणि लोकलवर पडल्या. या घटनेमुळे मोठा आवाज होताच ठाण्याच्या दिशेने जाणारी धीमी लोकल जागीच थांबली. लोकल जागीच उभी राहिल्याने प्रवाशांनी रुळावर उतरून पुढील स्थानक गाठले. या घटनेनंतर मध्य रेल्वेने धिम्या मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवल्या. धिम्या व जलद मार्गावरील लोकल एकाच मार्गावरून धावत असल्याने लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. लोकल उशिराने धावू लागल्याने अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर पोहोचण्यासही उशीर झाला. झाडाच्या फांद्या बाजूला करून व ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करून धिम्या मार्गावरील लोकल सुरळीत करण्यासाठी दोन तास लागले. सकाळी ११.१० वाजता डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक सुरू झाली.

हार्बर मार्गावर सकाळी पावणेबाराच्या सुमारास चुनाभट्टी ते जीटीबी नगर स्थानकादरम्यान ओव्हरहेड तारेवर मोठा फलक कोसळला. या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक बंद झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दोन्ही स्थानकांतील वीजपुरवठा बंद करून तो फलक हटवल्यानंतर अर्ध्या तासाने वाहतूक सुरू झाली. शिवडी ते कॉटन ग्रीन दरम्यान रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात झाडाच्या फांद्या पडल्यामुळे वडाळा ते सीएसएमटीदरम्यान अप मार्गावरील लोकल सेवा सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास विस्कळीत झाली. फांद्या हटवण्याचे काम रेल्वे कर्मचाऱ्यांकडून हाती घेण्यात आले. तोपर्यंत या मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या फांद्या हटवून लोकल पूर्ववत करण्यासाठी सायंकाळचे सहा वाजले.

मशीद रोड स्थानकाजवळ रुळांवर पाणी साचल्याने मध्य मार्गावरील वाहतूक दुपारी सव्वाएकच्या सुमारास बंद करण्यात आली. पाणी उपसा करणाऱ्या पंपाच्या साह््याने साचलेले पाणी उपसण्यात येत होते. पावसाचा जोर काहीसा कमी होताच पाणीही कमी झाले. अखेर एक तासांनी हा मार्गही पूर्ववत झाला.

पश्चिम रेल्वेवरील वाहतूक मात्र सुरळीत असल्याची माहिती जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली. परंतु सकाळच्या सुमारास विरार स्थानकाजवळीलच एका मॉलवरील पत्रा ओव्हरहेड वायरवर पडला. त्यामुळे हा पत्रा बाजूला काढण्यासाठी रेल्वेला पॉवर ब्लॉक घ्यावा लागला. हे काम त्वरित पूर्ण करून लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यात आले.

पत्रे, बॅनर, झाडाच्या फांद्या रुळांवर

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पश्चिम, मध्य रेल्वेच्या काही स्थानकांतील छतांवरील पत्रेच उडाले. तर अनेक ठिकाणी रुळांवर फलक, झाडाच्या फांद्याही पडल्या. सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक सात समोरून बाहेर पडणारा (जीपीओ दिशेने जाणारा) जागेवरील छताचे पत्रे वाऱ्यामुळे उडाले. पावसाच्या माऱ्यामुळे येथून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होत होता. येथे उपस्थित पोलीस प्रवाशांना दुसऱ्या बाजूने जाण्याचे आवाहन करीत होते. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ हे पत्रे बसविले. पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा, विरार स्थानकांतील फलाटाच्या छतांवरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या.