प्रवासी व्यवस्थापनाच्या अनेक योजना कागदावर, काहींचा बोजवारा

मुंबई : करोनामुळे लोकल आणि स्थानकांवरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा सल्ला देणाऱ्या रेल्वेच्या या संदर्भातील कित्येक योजना अजूनही कागदावरच आहेत, तर काही सुरू होऊन बंद झाल्या आहेत.

एरवी ८० लाख प्रवासी मध्य-पश्चिम रेल्वेने प्रवास करतात. सध्या पश्चिम रेल्वेवर ३ लाख ९५ हजार आणि मध्य रेल्वेवर ४ लाख ५७ हजार प्रवासी प्रवास करत आहेत. त्यांनाही लोकल सेवा देताना रेल्वेची तारांबळ उडत होती. त्यात सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची सूचना राज्य सरकारने के ल्याने रेल्वे प्रशासन पुरते गोंधळून गेल्याचे दिसून येत आहे. प्रवासी संख्या मर्यादित असतानाही अपुऱ्या तिकीट खिडक्या, ऑनलाइन किं वा अन्य मार्गाने तिकीट-पास काढू देणाऱ्या बंद सुविधा यांमुळे तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांगा दिसतात. मध्य रेल्वेच्या ३०० पैकी १८० तर पश्चिम रेल्वेच्या २९२ पैकी २७० तिकीट खिडक्या सुरू आहेत, तर स्मार्ट कार्डद्वारे तिकीट देणारे एटीव्हीएम, दोन रुपये अधिक देऊन तिकीट मिळणारी जनसाधारण तिकीट सेवा, मोबाइल तिकीट सुविधा, तिकीट खिडक्यांवरील पीओएस यंत्रे या तिकीट सेवा बंदच आहेत. प्रवासी संख्येत म्हणावी तशी वाढ नसल्याने या सेवा सुरू के ल्या नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. परंतु या सेवा बंद असल्याने सर्व महिला प्रवाशांसाठी लोकल खुली झाल्यानंतर तिकीट खिडक्यांसमोर लांबच लांब रांगा लागत आहेत. रेल्वे स्थानकातील प्रवेश नियंत्रण हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी प्रत्येक स्थानकात पूर्व दिशेला आणि पश्चिम दिशेने प्रत्येकी एकच प्रवेशद्वार ठेवले आहे. अन्य प्रवेशद्वारे खुली के ली तर एका प्रवेशद्वारावर होणारी गर्दी टाळता येईल. याबाबत मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के . के . अशरफ यांच्याकडे विचारणा के ली असता, कोणते प्रवेशद्वार पुन्हा सुरू करायचे याचा प्रवासी संख्या जशी वाढत जाईल, तसा विचार करू, असे त्यांनी सांगितले. लोकल सर्वांसाठी सुरू झाली तरीही १२ लाख प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देऊ शकतो, असे उत्तर राज्य सरकारला दिल्याचे त्यांनी स्पष्ट के ले. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त विनीत खरब यांनीही सध्या सर्वच प्रवाशांना प्रवासाची मुभा देणे शक्य नाही. तसेच प्रवासी संख्येवर किती प्रवेशद्वारे सुरू करायची हे ठरेल, असे सांगितले.

लोकल फे ऱ्या वाढवण्यास असमर्थ, योजना कागदावर

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर टाळेबंदीआधी ३,१४१ लोकल फे ऱ्या होत्या. आता ही संख्या १,४१० आहे. जशी प्रवासी संख्या वाढत आहे, तशी लोकल फे ऱ्यांत वाढ होत आहे. मात्र रेल्वे ३,१४१ पेक्षा जास्त फे ऱ्या वाढवू शकत नाही. लोकल फे ऱ्या वाढवण्याची रेल्वेची क्षमता संपली असून महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागल्यानंतर त्यात वाढ होऊ शकते. पश्चिम रेल्वेने अंधेरी ते विरारदरम्यान धिम्या मार्गावर १५ डबा लोकल प्रकल्पाचे काम सुरू के ले आहे. हे काम डिसेंबर २०२० पर्यंत संपेल. त्यानंतर या मार्गावर पंधरा डबा लोकलच्या १३० लोकल फे ऱ्यांची भर पडेल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकू र यांनी सांगितले. मध्य रेल्वेवरही कल्याणपासून अंबरनाथ, बदलापूरपर्यंत पंधरा डबा लोकलसाठी मार्गिका करण्यासाठी प्रस्ताव आहे. त्याला मात्र गती मिळालेली नाही.

अनधिकृत प्रवेशद्वारांची डोके दुखी

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ७४ ठिकाणी अनधिकृत प्रवेशद्वारे आहेत. ठाणे लोहमार्ग पोलीस हद्दीत १७ अनधिकृत मार्ग आहेत, तर कल्याण हद्दीत १०, कर्जत हद्दीत ९, गुरु तेजबहादूर नगर हद्दीत एक, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे एक, वाशी लोहमार्ग पोलीस हद्दीत १८, पनवेल हद्दीत ७, दादर पश्चिमेला एक, वांद्रे टर्मिनस येथे तीन, वसई रोड हद्दीत ७ अनधिकृत प्रवेशद्वारे आहेत. मेट्रो रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वाराप्रमाणेच सीएसएमटीच्या मेल-एक्स्प्रेस येथे स्वयंचलित प्रवेशद्वार (फ्लॅप गेट) उभारण्यात आले आहेत. हा प्रयोग उपनगरीय स्थानकांवर करण्याबाबत काहीच हालचाली नाहीत.