संचारबंदी निर्बंधांना स्थानकांत हरताळ

मुंबई :  ठोस कारण दिल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना प्रवासास परवानगी देऊ नये असे स्पष्ट आदेश असतानाही उपनगरीय रेल्वेमधून गुरुवारी सर्वसामान्य नागरिकांचा मुक्त संचार सुरू होता. कु ठे जायचे आहे, कशासाठी जायचे आहे याची विचारणा रेल्वे स्थानकांवर होतच नव्हती. ओळखपत्राची पडताळणीही अपवादात्मक ठिकाणी केली जात होती. तिकीटघरांवरही कुणालाही तिकीट दिले जात असल्यामुळे संचारबंदीच्या नियमावलीला पहिल्याच दिवशी हरताळ फासला गेला.

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्थानकात सकाळी ११.४५ च्या सुमारास नागरिकांना ओळखपत्र न पाहताच तिकीट देण्यात येत होते. याबाबत रेल्वे कर्मचाऱ्याला विचारणा के ली असता वरिष्ठांकडून अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे तिकीट दिले जात असल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितले, तर पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात प्रवासी थेट प्रवेश करीत होते. येथेही तिकीट खिडकीवर प्रवाशांकडे ओळखपत्राची विचारणा केली जात नव्हती. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातही हीच परिस्थिती होती. तेथेही ओळखपत्राची विचारणा न करताच प्रवाशांना तिकीट दिले जात होते. येथे तिकीट तपासनीसाला नागरिकांचे ओळखपत्र पाहिले जाते का अशी विचारणा केली असता त्यांनीही नकार दिला, तर कॉटन ग्रीन स्थानकातही प्रवाशांना तिकिटाची विचारणा केली जात नव्हती. पासधारक थेट गाडीत प्रवेश करत होते. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतरही नागरिक होते. तसेच अनेक जण विनाकारण फिरताना दिसत होते. दरम्यान, शीव रेल्वे स्थानकात मात्र दुपारी १२ ते ४ या वेळेत ओळखपत्र पाहूनच प्रवाशांना तिकीट दिले जात होते. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कु णालाही तिकीट दिले जात नव्हते.

दरम्यान, राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सर्वसामान्य नागरिक घराबाहेर पडणार नाहीत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच रेल्वेमधून प्रवास करतील. त्याचबरोबर सामाजिक अंतराचे पालन केले जावे यासाठी उपनगरीय रेल्वे गाडय़ांची संख्या कमी करण्यात आलेली नाही. पुढे परिस्थिती पाहून त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. राज्य सरकारने परवानगी दिलेले नागरिकच लोकलमधून प्रवास करतील याची काळजी घेतली जात आहे, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

..तरीही गर्दीत घट

राज्य सरकारने लागू के लेल्या कडक निर्बंधामुळे बहुतांश कार्यालये, आस्थापना बंद आहेत. त्यामुळे घराबाहेर कामानिमित्त पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यातून गुरुवारी पहिल्या दिवशी लोकलमध्ये फारशी गर्दी दिसत नव्हती. तसेच रेल्वेच्या डब्ब्यात उभे राहून प्रवास करणारेही दिसत नव्हते.