सकाळी मोबाइलवरील अलार्मबरोबरच दिवसभराच्या मीटिंग्ज, डेडलाइन्स याची जाणीव होते. धावपळीतच दिवस सुरू होतो.. राहत असलेल्या फ्लॅटला ‘घर’ म्हणता यावे इतपत त्याची थोडेफार लाड करून आणि फावलेल्या वेळात स्वत:चे लाड करेपर्यंतच बिल्डिंगखाली कॅबचा हॉर्न वाजतो आणि नाश्त्यापासून ऑफिस गाठून दिवस सुरू होतो.. तो कधी संपतो ते कळत नाही. हा दिनक्रम खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतेक सर्वाचाच. सकाळपासून रात्रीपर्यंत ‘तेच ते’वाल्या या दिनक्रमातील ताण कमी करण्यासाठी अनेक कंपन्यांनी प्रशिक्षित श्वानांकडे आपला मोर्चा वळवला आहे.

अनेक आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये या प्रशिक्षित श्वानांसाठी एखादे खास दालन आहे. या श्वानांचे काम काय, तर कंपनीतील कर्मचाऱ्यांना लळा लावणे, त्यांच्याशी खेळणे, त्यांचा ताण कमी करणे.. ही विशेष जबाबदारी पेलणाऱ्या या श्वानांची बडदास्त ठेवली जाते. जगभरातील अनेक देशांतील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी प्राणी पाळण्याची पद्धत अमलात आणली आहे. सध्या नेटीझन्सच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गुगल, फेसबुक, झिंगा या कंपन्याही ‘पेट फ्रेंडली’ आहेत. भारतातही अनेक कंपन्यांनी ही नवी पद्धत स्वीकारली आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळूरु, चेन्नई या ठिकाणी अनेक नव्या-जुन्या कंपन्यांनी ‘पेट फ्रेंडली’ धोरण स्वीकारले आहे. कामाच्या रगाडय़ातून थोडा वेळ काढून चहा किंवा कॉफी पिण्याइतकेच ऑफिसमधील सदस्य झालेल्या श्वानाशी खेळणे हा कार्यालयीन दैनंदिनीचा भाग झाला आहे. पाळीव श्वानांशी खेळून तरतरीत होऊन पुन्हा नव्या उत्साहाने कर्मचारी कामाला लागत आहेत.

सेवा देणाऱ्या संस्था

कंपनीतच एखादा प्राणी पाळून त्याला प्रशिक्षण देण्यात येते. कंपनीत ठेवण्यासाठी श्वानाला विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक असते. मूलभूत सवयी, काही सूचना ऐकणे, कर्मचाऱ्यांशी किंवा अभ्यागतांशी प्रेमाने वागणे यासाठीचे प्रशिक्षण श्वानाला दिले जाते.

कंपनीतील सुरक्षारक्षक किंवा कंपनीच्या आवारात राहणारे कर्मचारी हे या श्वानाचे पालक असतात. त्याचे खाणे-पिणे, औषधे, लसीकरण, स्वच्छता, प्रशिक्षण याचा सगळा जामानिमा या कंपन्या करतात. मूळ अमेरिकास्थित असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एका कंपनीच्या पुण्यातील शाखेत असा प्रशिक्षित श्वान कंपनीचा अविभाज्य भाग बनला आहे. काम सांभाळून ठरावीक वेळ या श्वानासोबत खेळण्यासाठी दिल्यावर काम करण्याचा उत्साह आणखी वाढत असल्याचे या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कंपनीतील श्वानाची काळजी घेण्याचा, प्रशिक्षण देण्याचा उद्योगही या जोडीने सुरू होत आहे.

पेट थेरपी

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि पर्यायाने शारीरिक आरोग्याचा विचार करून ‘पेट थेरपी’ ही संकल्पनाही अनेक कंपन्यांनी स्वीकारली आहे. एखाद्या ठरावीक दिवशी प्रशिक्षित श्वान कंपनीच्या आवारात येतात. त्यांच्याबरोबर त्यांचे प्रशिक्षक असतात. कंपनीतील कर्मचारी दिवसभर कामातून वेळ मिळेल त्याप्रमाणे या श्वानाशी खेळतात. पुण्यातील नावाजलेल्या कंपन्यांमध्ये ही पद्धत आता रूढ होऊ लागली आहे.

पेट थेरपीसाठी श्वान पुरवणाऱ्या अ‍ॅनिमल एंजल्सच्या मीनल कविश्वर यांनी सांगितले, ‘कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर असतो. कंपनीतील कामाबरोबरच इतरही अनेक आघाडय़ांवर प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या गोष्टींना सामोरी जात असते. अशा वेळी ताण कमी करण्यासाठी पेट थेरपी फायदेशीर ठरते. गेल्या वर्षी मुंबई विमानतळावर आम्ही प्रशिक्षित श्वान पुरवले होते. कर्मचारी आणि प्रवाशांचा ताण या श्वानांमुळे कमी होतो. नुकतेच आम्ही पुण्यातील एका कंपनीतही दिवसभराची कार्यशाळा घेतली. त्या कंपनीत

दोन पिल्ले आणि मोठे श्वान दिवसभरासाठी त्यांच्या प्रशिक्षकांसह होते. कंपनीच्या आवारात असलेले एखादे मांजर किंवा श्वान यांना हात लावणे, खाणे घालणे या पलीकडे जाऊन शास्त्रीय पद्धतीने पेट थेरपीच्या माध्यमातून ताण कमी होऊ शकतो.’