मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने प्रवाशांचा थकवा घालवण्यासाठी, तणावमुक्तीसाठी घेतलेल्या तीन ‘गोल्डन रिट्रीव्हर’ जातीच्या प्रशिक्षित श्वानांचे अपहरण झाल्याची तक्रार भांडुप पोलीस ठाण्यात तपासासाठी आली आहे. ही तक्रार फर बॉल स्टोरी (एफबीएस) या गुरुग्राम येथील कंपनीने केली आहे. कंपनीतून काढून टाकलेल्या अधिकारी महिलेवर अपहरणाचा आरोप करण्यात आला आहे.

पाळीव प्राण्यांच्या सान्निध्यात राहून, त्यांच्याशी खेळून, त्यांना खेळवून तणाव दूर करता येतो, मन ताजेतवाने होते, हे आंतरराष्ट्रीय निरीक्षण अग्रभागी ठेवून गुरुग्राम येथील अनिमेष कटियार या तरुणाने एफबीएस कंपनी सुरू केली. विमानतळासोबत कंपनीने करार केला.

त्यानुसार गेल्या वर्षी एफबीएसचे तीन प्रशिक्षित श्वान (गोल्डन रिट्रीव्हर) विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसोबत खेळत असत. कंपनीने आयुषी दीक्षित हिला श्वानांच्या हाताळणीसाठी नियुक्त करण्यात आले होते. आणि भांडुप पश्चिमेकडील एका इमारतीत भाडय़ाने घर घेऊन दिले. भाडेकरार आयुषीच्या नावे करण्यात आला.

अनिमेष यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आयुषी यांची कंपनीत १८ टक्के गुंतवणूक होती. मात्र तिच्या वर्तनावरून नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांना कंपनीतून काढण्यात आले. त्यांच्या जागी दोन तरुणांना श्वानांच्या हाताळणीसाठी नेमण्यात आले. कंपनीतून काढून टाकल्यानंतरही भाडेकरार तिच्याच नावे सुरू होता. २७ जानेवारीला अनिमेष विमानतळ अधिकाऱ्यांशी व्यावसायिक बोलणी करण्यासाठी मुंबईत आले, तेव्हा आयुषी प्रशिक्षण दिलेल्या तिन्ही श्वानांसोबत बेपत्ता झाल्याची माहिती अनिमेष यांना देण्यात आली.

इमारतीचे सुरक्षारक्षक, कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतल्यावर आयुषी यांनी नातेवाईकांसोबत कंपनीच्या मालकीच्या तीन श्वानांचे अपहरण केल्याची तक्रार अनिमेष यांनी भांडुप पोलिसांत दिली.

दरम्यान श्वानांची मालकी कंपनीची नसून स्वत:ची असल्याचा दावा आयुषी यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना  केला.