मुंबईतील श्वानपथकांचे साऱ्या क्षमतांसह प्रशिक्षण सुरू

जयेश शिरसाट, लोकसत्ता

मुंबई :  मुंबईत संघटित-असंघटित गुन्हेगारीच्या आरंभापासून गेली अनेक वर्षे गुन्हे आणि घटनांचा माग घेण्यात श्वानपथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. साखळी बॉम्बस्फोटानंतर सार्वजनिक कार्यक्रमांपासून ते भव्य सोहळ्यांच्या सुरक्षेची हमी देणाऱ्या श्वानांचा ताफा टाळेबंदीच्या काळातही दक्ष आहे. वर्दळ घटल्यामुळे गेले दोन महिने गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असले, तरी साऱ्या क्षमतांसह श्वानपथके आपला शिरस्ता पाळत होती. सध्याच्या परिस्थितीतही या श्वानपथकांच्या व्यायाम, प्रशिक्षणात कोणताही खंड पडलेला नाही.

जेजे स्कूल ऑफ आर्ट्स आणि कामा रुग्णालयाच्या मधील बोळाच्या अखेरीस एका बराकीत मुंबई पोलिसांच्या श्वानपथकाचं कार्यालय आहे. डॉबरमन, जर्मन शेफर्ड, बेल्जीयन शेफर्ड आणि लॅब्रेडोर अशा चार प्रजातीचे प्रशिक्षित श्वान येथे राहतात. टाळेबंदी हळूहळू शिथिल होत असल्याने आता त्यांची जबाबदारी वाढणार आहे. मात्र, तोपर्यंत वर्षभर दमणूक होणाऱ्या या श्वानांना विश्रांती देण्याचा प्रयत्नही त्याचे हँडलर्स करत आहेत.

माग काढण्याचे प्रशिक्षण

व्हिस्की, हनी, माया या तिघी लॅबड्रोर प्रजातीच्या श्वानपथकातल्या सर्वात धाकटय़ा, म्हणूनच लाडक्या. साधारण आठ-नऊ   महिने वयाच्या या तिघींना प्रशिक्षणासाठी पुणे येथे पाठवण्यात येणार होते. पण करोना आणि टाळेबंदीमुळे प्रशिक्षणसत्र रखडले. तोवर पथकातील अनुभवी अधिकारी, डॉग हॅण्डलर या तिघींना माग काढण्याचे (ट्रॅकिंग)प्रशिक्षण देत आहेत. गंधाद्वारे गुन्ह्य़ाची उकल करण्यासाठी लागणारी कौशल्ये त्यांच्यात विकसित केली जात आहेत. हॅण्डलर्सचे हातवारे, त्यांच्या खुणा हे पथक अवगत करीत आहे.

आराम आणि सज्जता

निवडणुका, मोठे कार्यक्रम, सण असे वर्षभराचे नियोजन श्वांनासाठीही  धावपळीचे ठरते. एकाच वेळी अनेक कार्यक्रम आले की श्वान पूर्णपणे थकून जातात. त्यामुळे टाळेबंदीचा कालावधी हा पर्वणी मानत श्वानांना शक्य होईल तेवढा आराम देण्यावर दोन्ही पथकांचा भर आहे. पोलिसांच्या श्वानपथकाप्रमाणेच बॉम्बशोधक, नाशकपथकाचे श्वानपथक. या दोन्ही पथकांतील श्वानांची काळजी घेणे आणि त्यांना नेहमी तयार ठेवण्याचे काम त्यांचे हँडलर्स करत आहेत.

काम कसे चालते?

गंभीर गुन्ह्यात आरोपींचा किंवा बेपत्ता व्यक्तींचा माग काढणे हे श्वानपथकाच्या तर स्फोटके शोधण्याचे काम बीडीडीएसच्या श्वानांचे असते. गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद वस्तू आढळली की ‘बीडीडीएस’कडून त्याची कसून तपासणी होते. शहरातल्या महत्त्वाच्या, संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा पडताळणीही नियमितपणे सुरू आहे. त्यातही बीडीडीएसच्या श्वान पथकाची महत्त्वाची भूमिका असते.

दिनक्रम कसा?

पहाटे फेरफटका झाल्यानंतर दुधाची न्याहारी. मग आज्ञा पाळण्याचे, माग काढण्याचे, स्फोटके शोधण्याचे प्रशिक्षण. दर पाच तासांच्या अंतराने मांसाहार हा या श्वानांचा दिनक्रम आहे. सुरक्षा पडताळणी आणि बेवारस वस्तूच्या मागावर गरज असल्यास या श्वानांना नेले जाते. कामगिरीवरून परतल्यावर त्यांची स्वच्छता केली जाते. पूर्ण शरीराच्या सुदृढतेची चाचपणी करूनच त्यांना केनलमध्ये नेले जाते. प्रत्येक श्वानाचे पालकत्व दोन हॅण्डलर घेतात.