मध्य रेल्वेवर मशीद बंदर रेल्वेस्थानकाजवळ रुळाला तडा गेल्याने बुधवारी सायंकाळी लोकलसेवा विस्कळीत झाली. या प्रकारामुळे दोन गाडय़ा काही काळ रोखून धरण्यात आल्या. त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला. ठाणे लोकलच्या मोटरमनला सायंकाळी सहाच्या सुमारास मशीद बंदरच्या जवळ रुळाला तडा गेल्याचे दिसले. लागलीच त्याने याबाबतची माहिती नियंत्रण कक्षाला कळवली. त्यामुळे एक ठाण्याकडे जाणारी आणि एक कल्याणकडे जाणारी लोकल काही काळ रोखून धरण्यात आली. नंतर रुळ बदलण्यासाठी काही काळ धीम्या मार्गावरील लोकलसेवा भायखळय़ापर्यंत जलद मार्गावर वळवण्यात आली.