ठाणे-पनवेल आणि ठाणे-वाशी मार्गावर रात्री उशिरापर्यंत लोकल गाडय़ा उपलब्ध होणार असून याचा फायदा तुर्भे, महापे, कोपरखैरणे येथील कंपन्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरील सर्व उपनगरी गाडय़ा मंगळवारपासून १२ डब्यांच्या होणार आहेत.
ठाणे-पनवेल मार्गावर रात्री वाशीहून ११.१० वाजता तर ठाण्याहून वाशीसाठी ११.४५ वाजता शेवटची गाडी निघते. रात्रीच्या गाडय़ांच्या फेऱ्या आणखी वाढविण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून रात्री १२.३८ वाजता शेवटची गाडी रवाना होते. त्यामुळे या मार्गावरही रात्री उशिरा किमान १२ वाजेपर्यंत गाडय़ांच्या फेऱ्या असाव्यात अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीचा विचार करण्यात येत असून मार्चपासून रात्री उशिरापर्यंत गाडय़ा चालविण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले. ट्रान्स हार्बर मार्गावर १ जानेवारीपासून सर्व गाडय़ा १२ डब्यांच्या करणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले होते. मात्र केवळ तीन गाडय़ा १२ डब्यांच्या उपलब्ध झाल्याने सर्व गाडय़ा १२ डब्यांच्या करणे शक्य झाले नव्हते. आता मध्य रेल्वेला नव्या दोन गाडय़ा १२ डब्यांच्या उपलब्ध झाल्यामुळे मंगळवारपासून सर्व फेऱ्या १२ डब्यांच्या होत असल्याचे, सूत्रांनी सांगितले.