07 April 2020

News Flash

डोंगरीतील गचाळ रस्त्याचा कायापालट

तब्बल ८६ दुकानांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती साहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली.

अब्दुल रेहमान स्ट्रीटचे आधीचे आणि सध्याचे छायाचित्र.

इंद्रायणी नार्वेकर

शैक्षणिक साहित्य, चामडय़ाच्या बॅगा, खेळणी, हार्डवेअरचे सामान यांची घाऊक दुकाने, विविध गोदाम, रस्त्यावरील फेरीवाले, हातगाडय़ांचा पसारा, लोंबकळणाऱ्या विजेच्या व केबलच्या वाहिन्या यातून मार्ग काढताना पादचाऱ्यांना करावी लागणारी कसरत हे अब्दुल रहमान मार्गावरील चित्र गेल्या काही दिवसांत पालटले आहे.

डोंगरी येथे केसरबाई इमारत पडून १३ जणांचा बळी गेल्यानंतर बी विभागातील अनधिकृत इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर पालिकेने धोकादायक व अनधिकृत इमारतींच्या विरोधात कारवाई करण्याची मोहीम उघडली. मात्र त्यातच ३ ऑगस्टला अब्दुल रहेमान मार्गावरील तय्यबी इमारतीला लागलेली आग विझवण्यास तब्बल ३६ तास लागले. दुकानाच्या आत ठेवलेले सामान जळाल्यामुळे खूप दाट धूर निघत होता, वारंवार आग लागत होती, लोंबकणाऱ्या केबल्समुळे आग विझवताना अडथळा येत होता. त्यामुळे या मार्गावरील अनधिकृत बांधकामांचा, लोंबकळत्या केबल्सचा, अनधिकृत गोदामांचा प्रश्नही चर्चेला आला. पालिकेच्या बी व सी विभागाने अब्दुल रहमान मार्गाची पाहणी करून येथील दुकानांना नोटिसा धाडल्या. या दुकानांची पाहणी करून ज्या दुकानांनी नियमांचे उल्लंघन केले अशा दुकानांवर गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी कारवाईची मोहीमच हाती घेण्यात आली होती.

या कारवाईपूर्वी १८३ दुकानांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल ८६ दुकानांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती साहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली.

या कारवाईदरम्यान दुकानांचा बाहेर आलेला भाग, पदपथावर दुकानांनी केलेले अतिक्रमण हटवण्यात आले. तसेच बेस्टच्या मदतीने या मार्गावरील लोंबकणाऱ्या केबल्सही हटवण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, एमटीएनएल, बेस्टच्या केबल्स, स्थानिक केबल व्यापाऱ्यांनी टाकलेल्या केबल्स यामुळे या विभागात वायरींचे जाळेच तयार झाले होते. हे जाळे हटवल्यामुळे या संपूर्ण मार्गाचे रूप पालटले असून लोकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अनधिकृत गोदामांवर खटले

या विभागात मोठय़ा प्रमाणावर घाऊक मालाची दुकाने असल्यामुळे खाली दुकान वर इमारतीत गोदामे अशी स्थिती आहे. त्यामुळे आम्ही या विभागातील सर्व गोदामांची पाहणी केली. शैक्षणिक साहित्य, थर्माकोलच्या शीटस, सॉफ्ट टॉईज, पर्सेस यांची गोदामे मोठय़ा प्रमाणावर असून त्यापैकी काही गोदामांसाठी परवानाही घेतलेला नाही, असे आढळून आलेले आहे. त्यामुळे अशा गोदामांवर खटले दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विसपुते यांनी दिली. तर या मोहिमेमुळे अनेक दुकानदार आता रीतसर गोदामासाठी परवाना मागण्यासाठीही पुढे येऊ लागले असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2019 1:41 am

Web Title: transform a dirt road into a mountain abn 97
Next Stories
1 खाद्यपदार्थ पोहचवणारे अ‍ॅप अडचणीत?
2 मरिन ड्राइव्हचे दर्शन घडवणाऱ्या गॅलरीसाठी शुल्क
3 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ‘गणेश गौरव स्पर्धा’
Just Now!
X