ऐतिहासिक महत्त्व टिकविणार; स्थानकांत आधुनिक सुविधा

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी आणि चर्नी रोड स्थानकांना नवी झळाळी देताना त्यांचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यात येणार आहे. तसेच, स्थानकांच्या कायापालटानंतर अनेक आधुनिक सुविधाही देण्यात येणार आहेत. या दोन्ही स्थानकांत नवीन इमारतीचे बांधकाम केले जाईल. त्यात अतिरिक्त तिकीट खिडक्या, आसनव्यवस्थेत बदलांसह अन्य सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे.

आयआयटी मुंबईने महालक्ष्मी स्थानकात असलेली उन्नत (एलिव्हेटेड) स्थानक इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दिला आहे. या इमारतीत तिकीट खिडकी सुविधा असून याच उन्नत इमारतीतून प्रवासी स्थानकात प्रवेश करतात. या अहवालानंतर पश्चिम रेल्वेने उन्नत स्थानक इमारतीची पुनर्बाधणी करण्याबरोबरच त्यात प्रवाशांना उत्तम सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तिकीट खिडक्यांच्या सुविधेसह असलेली जुनी उन्नत इमारत पाडून पुन्हा तशीच इमारत बांधण्याचे नियोजन केले आहे. महालक्ष्मी स्थानकातील फलाट, पादचारी पुलांना नवीन उन्नत इमारत जोडताना प्रवाशांसाठी त्यात प्रशस्त व मोकळी जागा निर्माण केली जाणार आहे. यात प्रवेशद्वार आणखी मोठे के ले जातील, जेणेकरून स्थानकात प्रवेश करताना प्रवाशांची गर्दी होणार नाही. तसेच उन्नत इमारतीतून फलाटावर उतरण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध के ली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. याच इमारतीत प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तिकीट खिडक्या, एटीव्हीएमसारखी सुविधाही प्रवाशांसाठी असेल.

महालक्ष्मीबरोबरच चर्नी रोड स्थानकाचाही कायापालट करण्यात येणार आहे. या स्थानकातही नवीन इमारतीचे बांधकाम केले जाईल. यात नवीन तिकीट खिडकी सुविधा, एटीव्हीएमसाठी स्वतंत्र सेवा, स्टेशन मास्तर कार्यालय, मुख्य स्टेशन अधीक्षक कार्यालय उभारले जाईल.

वर्षभरात काम पूर्ण

चर्नी रोड स्थानकासाठी अडीच कोटी रुपये आणि महालक्ष्मी स्थानकाचा कायापालट करण्यासाठी ३ कोटी २० लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितली. दोन्ही स्थानकांच्या कामांसाठी निविदा काढण्यात आली असून वर्षभरात ते पूर्ण के ले जाणार आहे.