अंधेरी आरटीओला अंधारात ठेवून झोपु प्राधिकरणाची परस्पर संमती

मुंबई : अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या भूखंडावरील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात पुन्हा घोटाळा झाल्याची बाब ‘आम आदमी पार्टी’ने याचिकेद्वारे निदर्शनास आणलेली असतानाच आता वाहन चाचणीसाठी राखीव असलेल्या भूखंडावर संक्रमण शिबीर उभारण्याची परवानगी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने दिली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अंधेरी आरटीओच्या भूखंडावर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प राबविणाऱ्या मे. चमणकर इंटरप्राइझेस यांच्याकडून नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन, अंधेरी आरटीओ कार्यालय, मलबार हिल येथील अतिथीगृह बांधून घेण्यात येणार होते. ही सर्व बांधकामे मे. चमणकर यांनी अंतिम टप्प्यात आणलेली असताना लाचप्रकरणी कारवाई होऊन भुजबळ तुरुंगात गेले. त्यानंतर चमणकर यांना या प्रकल्पातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर या प्रकल्पासाठी नवा विकासक निवडण्यासाठी निवडणूक घेण्यात आली आणि मे. शिव इन्फ्राव्हिजन ही कंपनी निवडण्यात आली. या कंपनीतील एक संचालक हे झोपु प्राधिकरणाने काळ्या यादीत टाकलेल्या तसेच सक्तवसुली महासंचालनालयाच्या आरोपपत्रातील आरोपी असल्याची बाबही पुढे आली. या निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्याची तक्रार ‘आप’ने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच सक्तवसुली महासंचालनालयाकडे वारंवार केली. परंतु त्याची दखल घेतली न गेल्यानेच आता या नव्या घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याचिकेत केली आहे. या याचिकेची सुनावणी प्रलंबित असतानाच प्राधिकरणाने नव्या विकासकाला सर्व परवानग्या देण्याचा सपाटा लावला आहे.

वाहन चाचणीसाठी राखीव भूखंडावर संक्रमण शिबिराला परवानगी देताना प्रादेशिक परिवहन विभागाला कल्पनाही देण्यात आली नाही, असा आरोप अंधेरी प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे यांनी केला आहे. वाहन चाचणीसाठी राखीव असलेल्या भूखंडावर संक्रमण शिबीर बांधण्यास सुरुवात झाली तेव्हाच आपण त्यास आक्षेप घेतला. याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाला काहीही कळविण्यातही आले नाही. याबाबतचा अहवाल आपण लगेचच परिवहन आयुक्तांना पाठविला आहे. सध्या जागच्या जागी स्वयंचलित वाहन चाचणी करण्याच्या प्रस्तावाचा विचार सुरू आहे. पुण्यातील संस्थेने पाहणी करून खर्चाचा तपशीलही दिला आहे, याकडे देशपांडे यांनी लक्ष वेधले.

अंधेरी आरटीओ भूखंडावरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी परिवहन विभागाने याआधीच ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यानंतर काही जागा अदलाबदल करून हव्या होत्या. त्याबाबत परिवहन विभागाला कळविण्यात आले होते. मात्र प्रस्तावित संक्रमण शिबीर हे वाहन चाचणी भूखंडावर आहे का, हे तपासून पाहावे लागेल.

– शेखर चन्ने, परिवहन आयुक्त