खासगी वाहतुकीबरोबरच अन्य खर्च वाढल्याने एस. टी. महामंडळाला वर्षभरात सुमारे ६०० कोटींचा तोटा झाल्याची धक्कादायक माहिती सरकारच्या वतीने विधानसभेत देण्यात आली आहे.
कमी गर्दीच्या वेळी खासगी वाहतूकदार एस. टी. भाडय़ाच्या तुलनेत कमी भाडे आकारतात, तर सणासुदीच्या दिवसांत किंवा गर्दीच्या हंगामात जादा भाडे आकारून स्वत:चा फायदा करून घेतात, अशी कबुली परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शिवसेनेचे सदा सरवणकर यांच्या प्रश्नावरील उत्तरात दिली आहे. खासगी वाहतुकीमुळे एस.टी. मंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होतो. राज्यातील बहुतांशी एस. टी. स्थानकाच्या बाहेर खासगी बसेस उभ्या राहतात. वास्तविक एस. टी. स्थानकापासून २०० मीटर परिसरात खासगी बसेस उभ्या करण्यास बंदी आहे. पण अनेकदा एस. टी.चे अधिकारी, वाहतूक पोलीस आणि खासगी बसमालक यांचे संगनमत होते. काही ठिकाणी एस.टी.चे अधिकारी खासगी बसेस रोखण्याचा प्रयत्न करीत असले तरी वाहतूक पोलिसांची त्यांना मदत होत नाही.