परिवहन आयुक्तपदी श्याम वर्धने

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी प्रशासनात फेरबदल केले असून गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या सहकार विभागाच्या प्रधान सचिवपदी एस. एस. संधू यांची नियुक्ती केली आहे. तर परिवहन आयुक्तपदी श्याम वर्धने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर केंद्राच्या धर्तीवर राज्यातही कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हे खाते आपल्याकडे ठेवत त्यासाठी एस.एस संधू यांची सचिवपदी नियुक्ती केली होती. त्यावेळी संधू महसूल विभागाच्या सचिवपदी ठेवावे यावरून महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री यांच्यात वादंगही झाला होता. त्याच संधू यांची कालावधी पूर्ण न होताच अवघ्या वर्षभरात बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे महत्वाच्या सहकार विभागाच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परिवहन आयुक्त सोनिया सेठी केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्या असून त्यांच्या जागी नागपूर सुधार प्रन्यासाचे अध्यक्ष श्याम वर्धने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ए.आर.शिंदे यांची मत्स्य विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी तर यशदाचे उप महासंचालक के.एम. नागरगोजे यांची महिला आणि बालकल्याण विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.