रिक्षा-टॅक्सींच्या मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांना चाप बसणार

रिक्षांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार करून प्रवासी भाडय़ात भरमसाट वाढ करणाऱ्या चालकांना चाप लावण्यासाठी दंडाच्या रकमेतच वाढ करण्याचा पर्याय परिवहन विभागाकडून शोधण्यात येत आहे. एखाद्या चालकाकडून गुन्हा घडल्यास वाहनजप्तीची कारवाईदेखील केली जाते. मात्र मुंबईतील जागेअभावी वाहनजप्तीची कारवाई आरटीओकडून केली जात नाही. हे पाहता त्याला पर्याय म्हणून रिक्षा किंवा टॅक्सीच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार केल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा विचार केला जात असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. सध्या इलेक्ट्रॉनिक मीटरचे सील तोडल्याप्रकरणी चालकांवर १,२५० रुपये दंड आणि लायसन्स निलंबनाची कारवाई केली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच घडलेल्या एका घटनेत इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार घडल्याचे निदर्शनास आले. ठाण्यातील कापूरबावडी येथून जोगेश्वरी येथे जाणाऱ्या एका प्रवाशाने रिक्षा पकडली. नेहमीच्या मार्गावर प्रवास करताना ३०० रुपये होणारे भाडे ६० रुपयांनी वाढले. या प्रवासात प्रवाशाला रिक्षा चालकाकडून एका बटनाद्वारे भाडय़ात वाढ करत असल्याचे आढळले. याची तक्रार प्रवाशाकडून आरटीओ आणि पोलिसांकडे करण्यात आली. त्यानंतर उशिराने जाग आलेल्या परिवहन विभागाने मुंबईतील वांद्रे ते दहिसपर्यंत धावणाऱ्या रिक्षांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पथकही नेमले. आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक मीटरचे सील तुटलेल्या जवळपास ४०० रिक्षा आढळल्या. त्यांच्यावर कागदपत्र जप्तीच्या कारवाईबरोबरच दंडही आकारण्यात येऊ लागला. मुळातच इलेक्ट्रॉनिक मीटरचे तुटलेले सील आणि फेरफार हा एक फसवणुकीचा गुन्हा असून यात वाहनजप्तीची कारवाई केली जाते. मात्र मुंबईत जागाच शिल्लक नसल्याने वाहनजप्तीची कारवाई आरटीओकडून केली जात नाही.