अमर सदाशिव शैला

वाहतुकीची शिस्त वाहनतळाभोवतालच्या ५०० मीटर परिसरातच; अन्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी कायम

मुंबई महापालिकेने शहरातील निवडक २३ वाहनतळाच्या ५०० मीटर परिसरातच ‘नो पार्किंग’ करणाऱ्यांकडून जबर दंड वसुली सुरू केल्याने, त्या पलीकडील परिसरात मात्र वाहनतळ शिस्तीचा आणि पर्यायाने वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. कारवाईच्या भीतीने नागरिक वाहनतळाच्या ५०० मीटर परिसरात वाहन लावत नसल्याने तेवढेच रस्ते मोकळे दिसतात. मात्र ५०० मीटर पलीकडच्या रस्त्यावर दुतर्फा सर्रास वाहन लावली जात असल्याने वाहतूक कोंडी कायम आहे.

महापालिकेने पहिल्या टप्प्यात केवळ २३ वाहनतळांच्या ५०० मीटर परिसरात वाहन लावणाऱ्या चालकांवर दंडाचा बडगा उगारायचे ठरविले आहे. वांद्रे पश्चिममध्ये पालिकेच्या एल्को बाजार परिसरात पालिकेचे वाहनतळ आहे. मात्र वाहनतळाच्या आजूबाजूचा ५०० मीटर परिसर सोडला तर अन्यत्र बेशिस्तपणे वाहने उभी केली जात आहेत. हेच चित्र सांताक्रूझ पूर्व भागातील कलिना परिसरात सीएसटी रस्त्यावरही आहे. परंतु इथेही वाहनतळाच्या ५०० मीटर पलीकडे मोठय़ा संख्येने बेकायदेशीरपणे वाहने लावण्यात आली होती. त्यामुळे ५०० मीटर परिसरातील रस्ते मोकळे असले तरी त्यापुढे वाहतूक कोंडी कायम होती.

एल्को बाजार परिसरात सायंकाळी रहिवासी मोठय़ा संख्येने खरेदीसाठी बाहेर पडतात. ते आपले वाहन रस्त्याच्या दुतर्फा कसेही लावून जातात. त्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मंगळवारी दुपारच्या वेळेस होली फॅमिली रुग्णालयाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या वाहनांमुळे रिक्षाची एका चारचाकी वाहनाला धडक बसली. त्यातून त्यांच्यात थोडी वादावादीही झाली. वांद्रे परिसरात मुख्य रस्त्यावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असला तरी आतील परिसरात ‘नो पार्किंग’च्या फलकाखालीच गाडय़ा लावण्यात आला होत्या. वांद्रेतील भाभा रुग्णालयाच्या परिसरात कारवाईच्या भीतीने वाहनचालक गाडी रस्त्याच्या कडेला लावून तिच्यातच बसून होते. तर एस. व्ही. रस्ता परिसरात वाहने बिनदिक्कत रस्त्याकडेलाच लावण्यात आली होती. या रस्त्यावर मेट्रो कामामुळे कायमच वाहतूक कोंडी होत असते. त्यात वाहने रस्त्यावर उभी राहिल्याने भर पडते आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहने तर सर्रास लावली जात आहेत.

एल्को बाजार परिसरातील पालिकेच्या वाहनतळाची ९५ गाडय़ांची क्षमता आहे. नागरिकांनी गाडय़ा रस्त्यावर उभ्या करू नयेत यासाठी पालिकेचे कर्मचारी येथे ध्वनिक्षेपकावरून सूचना देत असतात. मात्र हे वाहनतळ दुपारपर्यंत भरते. परिणामी इथली कारवाई काहीशी शिथिल होते. सांताक्रूझ पूर्वेला नेहरू रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावल्याचे चित्र होते. परिसरात जवळपास कोणतेच वाहनतळ नसल्याने रस्त्याच्याकडेलाच वाहने लावण्याशिवाय गत्यंतर नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेहरू रस्त्यावर कायमच वाहतूक कोंडी असते, अशी माहिती रिक्षाचालकांनी दिली. कलिना परिसरात सीएसटी रस्त्यावर पालिकेची दोन वाहनतळे आहेत. मात्र इथेही वाहने रस्त्याकडेला लावल्याचे चित्र होते. तसेच वाहनतळांच्या ५०० मीटर पुढील रस्त्यावर चारचाकी वाहनाबरोबर दुचाकी वाहनेही बेकायदेशीररीत्या वाहतुकीला अडथळा ठरतील अशा रीतीने लावण्यात आल्याचे दिसत होते.

नागरिकांचा आंदोलनचा इशारा

गोरेगावमधील अशोकनगर परिसरात रस्त्याच्याकडेला लावण्यात आलेली वाहने उचलण्यास गेलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये वादावादी झाली. स्थानिकांच्या विरोधामुळे कारवाई न करताच कर्मचाऱ्यांना माघारी फिरावे लागले. कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. तसेच त्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.