कारखाने सुरू, पण दुकाने बंद असल्याने मालवाहतुकीत ६० टक्कय़ांची घट

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध जारी करताना अटीसापेक्ष उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असली तरीही जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने आणि बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे मालवाहतुकीवर परिणाम झाला असून त्याचा प्रचंड फटका मालवाहतूकदारांना बसला आहे. अन्य राज्यात माल घेऊन जाणारी वाहने परतीच्या प्रवासात रिकामीच येत आहेत. आजघडीला सुमारे ३० ते ४० टक्के मालवाहतुकीची वाहने रस्त्यावर धावत असून पूर्वीच्या तुलनेत केवळ ४० ते ५० टक्के मालवाहतूक होत आहे. परिणामी, मालवाहतूक व्यवसायाला दरदिवशी साधारण ३१५ कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.

गेल्या आठवडय़ात सूर्यकांत शेलार हे मालाची गाडी भरून बंगळुरू येथे गेले. बंगळूरू येथून परतीचे भाडे मिळेल या आशेवर त्यांनी नवी मुंबई येथून भाडे घेतले. बंगळुरू येथे शेलार यांना भाडे मिळण्यासाठी पाच दिवस वाट पाहावी लागली. या काळात त्यांच्यासोबत गाडीवर कामाला असलेल्या चालकाचा पगार सुरू होता. तसेच दोघांच्या जेवणाचा खर्चही करावा लागत होता.

सध्या केवळ भाजीपाला, धान्य आणि करोनाविषयक वस्तूंची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे सध्या ७० टक्के व्यवसाय ठप्प झाला आहे. आमच्याकडे २०० ट्रक आहेत. केवळ ५० ट्रक सुरू आहेत. अजून कोणत्याही कामगाराला कमी केले नाही. सर्वाना पगार देण्यात येत आहेत. तसेच कर्जाचे हप्ते, कर, विमा हे द्यावेच लागते. हीच परिस्थिती राहिल्यास कामगार कमी करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, असे श्री नाशिक ट्रान्सपोर्टचे चिराग कटारिया यांनी सांगितले.

मुंबई ते दिल्ली दरम्यान एका महिन्यात एका गाडीच्या चार फेऱ्या होत होत्या. सध्या केवळ दोन फेऱ्या होत नाहीत. त्यामुळे वाहतूकदरांचे मोठे नुकसान होत आहे. कामगारांचा पगार, कर भरावा लागतो. त्यातच डिझेलचे दरही प्रचंड वाढले आहेत. मात्र माल वाहतुकीचे कामच मिळत नसल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या व्यवसायाला सावरण्यासाठी सरकारने करामध्ये सवलत द्यावी, टोल माफ करावा, अशी मागणी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या कोअर समितीचे अध्यक्ष बल मलकित सिंग यांनी केली.

परतीच्या प्रवासात गाडय़ा रिकाम्या

काही कारखाने सुरू आहेत. मात्र दुकाने बंद आहेत. त्यामुळे कारखान्यात तयार झालेला उत्पादनाला मागणी नाही. त्यामुळे वाहतूकदारांना दोन्ही बाजूचे भााडे मिळत नाहीत. नवी मुंबई येथील बाजारातून धान्य भरून सुरत येथे गाडी गेली होती. तेथून कपडे घेऊन गाडी परतणार होती. मात्र सध्या दुकाने बंद आहेत. त्यामुळे तिकडे उत्पादित केलेल्या कपडय़ांना मागणी नाही. त्यामुळे गाडी रिकामीच परतली. तसेच नाशिक येथून सॅनिटायझर घेऊन राजकोटला गाडी गेली होती. मात्र तेथून येताना गाडय़ांचे सुटे भाग घेऊन यायचे होते. पण तेही रद्द झाले. गाडी रिकामीच माघारी आली. त्यामुळे सुमारे २२ हजार रुपये तोटा सहन करावा लागला, असे कटारिया यांनी सांगितले.