‘आयआयटी’सह इतर काही केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षेच्या (जेईई) केंद्रापर्यंत कसे पोहोचायचे, असा प्रश्न मुंबई महानगर परिसरातील विद्यार्थ्यांना पडला आहे. परीक्षा दोन दिवसांवर (१ ते ६ सप्टेंबर) आली असून विद्यार्थ्यांसाठी रेल्वे सुरू होणार की नाही, याबाबत अद्यापही संभ्रम आहे.

विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेकरिता लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळावी, अशी मागणी पालक करीत आहेत. प्रवासी संघटनेनेही तशी मागणी केली आहे. मात्र परीक्षा दोन दिवसांवर आली तरीही रेल्वे प्रवासाच्या परवानगीबाबत सरकार ढिम्म आहे.

दरम्यान, जेईई, नीटचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना लोकल रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या अधिकार कक्षेत आहे. अद्याप प्रवास परवानगीविषयी सरकारकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. सूचना आल्यास नक्की पालन केले जाईल, असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी स्पष्ट केले.

जेईई मुख्य परीक्षेसाठी मुंबई आणि नवी मुंबईतील २० हजार २५६ आणि ठाण्यातील ७१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. देशभरात १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. मात्र, परीक्षा केंद्रापर्यंत कसे पोहोचायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहे. अनेक विद्यार्थ्यांना दूरवरची केंद्रे मिळाली आहेत. मुंबईत लोकल केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता चालविण्यात येत आहे. बसच्या फेऱ्या मर्यादित आहेत. खासगी वाहन चालक अवाच्यासव्वा भाडे घेत आहेत. सकाळी नऊच्या सत्रातील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ७.४५ वाजेपर्यंत उपस्थित राहावे लागणार आहे. पाच मिनिटे उशीर झाल्यामुळे परीक्षेस मुकल्याचे विद्यार्थ्यांचे अनुभव आहेत. गर्दीची वेळ आणि परीक्षेपूर्वी सुमारे तासभर आधी केंद्रावर उपस्थित राहण्याची सक्ती या परिस्थितीत रेल्वेचा प्रवास अधिक सोयीचा असल्याचे पालकांचे मत आहे.

विद्यार्थ्यांची अडचण काय?

अनेक विद्यार्थ्यांना दूरवरची केंद्रे मिळाली आहेत. मुंबईत लोकल केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता चालविण्यात येत आहे. बसफेऱ्या मर्यादित आहेत. खासगी वाहन चालकांचे भाडे अवाच्यासव्वा आहे. सकाळी नऊच्या सत्रातील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ७.४५ वाजेपर्यंत उपस्थित राहावे लागणार आहे, अन्यथा परीक्षेस मुकावे लागू शकते. रायगड, पालघर येथील विद्यार्थ्यांनाही मुंबई, ठाणे येथील परीक्षा केंद्रे मिळाली आहेत. वसईतील विद्यार्थ्यांना कोपरखैरणे, मुलुंड येथील विद्यार्थ्यांला अंधेरी अशी दुसऱ्या टोकाची परीक्षा केंद्रे मिळाली आहेत.

मुभा मिळणार? मुंबई आणि महानगर प्रदेशातील  विद्यार्थ्यांना जेईई मुख्य परीक्षा देण्यासाठी उपनगरी रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा देण्यात येईल. या संदर्भातील आदेश लागू  केला जाईल आणि तसे रेल्वेला लेखी कळविण्यात येईल, असे राज्य सरकारमधील एका उच्चपदस्थाने सांगितले.

विद्यार्थ्यांना किंवा अन्य कोणालाही प्रवास परवानगी हवी असेल तर त्यांनी राज्य सरकारकडे मागणी करावी. याबाबत आम्ही स्वत:हून पुढाकार घेऊ शकत नाही. या निर्णयात राज्य सरकार आणि रेल्वे बोर्डाची भूमिका महत्त्वाची असते.

– शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मध्य रेल्वे)