01 December 2020

News Flash

इंधन दरवाढीमुळे प्रवास महाग

सार्वजनिक वाहतूक नसल्याने खासगी वाहनांनी प्रवास

सार्वजनिक वाहतूक नसल्याने खासगी वाहनांनी प्रवास; पेट्रोल, डिझेल महाग झाल्यामुळे अधिक पदरमोड

मुंबई : टाळेबंदीमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या सेवेमुळे खासगी वाहनांनी कामाचे ठिकाण गाठणाऱ्या सर्वसामान्य नोकरदारांना आता इंधन दरवाढीमुळे झळा बसू लागल्या आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढत झाल्यामुळे खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. टाळेबंदीमुळे आधीच आर्थिक उत्पन्नात झळ सोसणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी हा भुर्दंड असह्य़ होऊ लागला आहे.

टाळेबंदी शिथिल झाली असली तरी रेल्वेअभावी ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार परिसरांत राहणाऱ्या नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. बसगाडय़ांनी प्रवास करण्यासाठी सकाळच्या वेळी तासन्तास रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापुरातील अनेक कर्मचारी गटागटाने खासगी वाहनाने प्रवास करत आहेत. एका कर्मचाऱ्याच्या वाहनातून प्रवास करण्याच्या मोबदल्यात इंधनखर्च विभागून दिला जातो. मात्र गेल्या पंधरवडय़ापासून दररोज इंधनाचे दर वाढत असल्याने प्रवासासाठीच्या खर्चात दररोज वाढ होत आहे.

बदलापूर, कल्याण, अंबरनाथ या भागांतून मुंबईत येणाऱ्या वाहनाला आठवडय़ाला तीन ते चार हजार रुपयांचे इंधन लागते. महिन्याला हा खर्च १५-१६ हजारांच्या घरात जातो. परिणामी एका वाहनातून प्रवास करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना महिन्याला तीन-चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यातच खासगी वाहनातील प्रवासी संख्येवर निर्बंध असल्याने अनेकदा दोन किंवा तीन प्रवाशांतच हा खर्च विभागावा लागतो. आणखी महिनाभर असाच प्रवास करावा लागल्यास आमच्यासारख्या सामान्य कर्मचाऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होईल, असे मत बदलापूर येथे राहणारे आणि दादर येथील खासगी आस्थापनात काम करणारे दीपक काळे यांनी व्यक्त केले. ‘बँकेतील नोकरी असल्याने दरदिवशी बदलापूरहून सीएसएमटीला जावे लागते. सध्या एका खासगी वाहनाने दोघे जण प्रवास करतो. त्याला प्रत्येकी दरदिवशी ४०० रुपये खर्च येतो. त्यातून महिन्याकाठी जवळपास आठ हजार रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे,’ असे मत शुभदा जोशी यांनी मत व्यक्त केले.

पुणे आणि नाशिक येथून दरदिवशी चाकरमानी मंत्रालयात आणि महापालिकेत कामाला येतात. रेल्वे सेवा बंद असल्याने या चाकरमान्यांना खासगी वाहनांनी कार्यालय गाठावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांनाही महिन्याला दहा ते बारा हजार रुपये केवळ प्रवासापोटी खर्च करावे लागत आहेत.

मालवाहतूकही महागणार

ठाणे : डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसारख्या भागात माल वाहतुकीचे काम करणाऱ्या वाहतूकदारांवर खर्चाचे ओझे वाढू लागले असून करोना पूर्वकाळापेक्षा २० ते २५ टक्क्यांची भाडेवाढ करण्याची तयारी संघटनांनी सुरू केली आहे.

गेल्या काही दिवसांत इंधन दरांत सातत्याने वाढ होत असल्याने जमा आणि खर्चाचे गणित विस्कटू लागले आहे, असे मालवाहतूकदारांचे म्हणणे आहे. या इंधनदरवाढीमुळे मुंबई, ठाण्यातील लहान ट्रक टेम्पो आणि अवजड वाहनांच्या संघटना भाडेवाढीच्या तयारीला लागल्या असून येत्या काही दिवसांत २० ते ३० टक्क्यांची भाडेवाढ निश्चित आहे मानली जात आहे. ही भाडेवाढ झाल्यास भाजीपाला, अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढू शकतात. दररोज इंधनाच्या दरात वाढ होत असल्याने माल वाहतूकदारांच्या विविध संघटनांकडून सरकारसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सरकार चर्चा करत नाही. इंधन दरवाढ झाली असतानाही दर कमी होतील या आशेवर इतके दिवस पूर्वीच्या दराप्रमाणे वाहतूक दर आकारत आहोत. आता मात्र पर्याय नाही अशी माहिती बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे व्यवस्थापकीय सदस्य अभिषेक गुप्ता यांनी दिली.

आधीच टाळेबंदीत मालवाहतुकीची कामे कमी मिळत होती. त्यामुळे उत्पन्न कमी होते. मात्र इंधनदरवाढीमुळे त्यात आणखी भर पडली असून उत्पन्न कमी, खर्च जास्त अशी परिस्थिती झाली आहे. खर्चात ६० ते ६५ टक्केपर्यंत वाढ झाली असून मालवाहतूकदारांना भाडे वाढविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

– कैलाश पिंगळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मोटर मालक संघ

देशात इंधन दरवाढ सुरू आहे. आम्ही सरकारकडे याबाबत दिलासा मागितलेला आहे. मात्र सरकारने आमच्या मागण्या विचारात घेतल्या नाही. तर आम्हाला नाइलाजाने संपावर जावे लागेल.

–  विठ्ठल धुमाळ, अध्यक्ष, नवी मुंबई ट्रान्सपोर्ट असोसिएशन.

सध्याचे वाहतूक दर (एका फेरीचे)

                                ट्रक    कंटेनर

नाशिक ते मुंबई          १५००    २५००

पुणे ते मुंबई               २०००    ३०००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 4:33 am

Web Title: travel is expensive due to fuel price hike zws 70
Next Stories
1 करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण रात्री-अपरात्री अधिक
2 मरोळच्या पोलीस रुग्णालयात उपचारांसह मानसिक स्वास्थ्यावर भर
3 जप्त वाहने सोडवताना नागरिक वेठीस
Just Now!
X