रद्द करूनही सहलीचे पैसे परत केले नसल्याच्या आरोपाखाली नौपाडा पोलिसांनी सचिन ट्रॅव्हल्सचे मालक सचिन जकातदार यांना अटक केली. ठाणे सत्र न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली असून  न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्याने त्यांची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली आहे.
चरई परिसरात राहणारे असीम गुप्ते यांनी राजस्थान सहलीसाठी सचिन ट्रॅव्हल्समध्ये दोन वर्षांपूर्वी एक लाख २८ हजार रुपये भरले होते. कंपनीने काही कारणास्तव ही सहल रद्द केली. मात्र, या सहलीचे पैसे गुप्ते यांना परत केले नव्हते. त्यासाठी गुप्ते या कंपनीच्या कार्यालयात खेटे घालत होते. तेथे त्यांना कोणीही दाद देत नव्हते.
एक दिवस  कंपनीच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना याच मानसिक तणावातून जिन्यात पडून मृत्यू त्यांचा झाला होता. या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी कंपनीचे मालक सचिन जकातदार यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना सोमवापर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली तसेच त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याची माहिती पोलिसांनी दिली.