‘जेव्हीएलआर’वर सतत वाहतूक कोंडी

सुहास जोशी, मुंबई</strong>

पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा अत्यंत महत्वाचा मार्ग असलेला जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड हा दिवसभर सतत वाहनांची वर्दळ असणारा सध्या प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करत आहे. या मार्गावर सुरु असलेल्या स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मेट्रो ६ मार्गिकेच्या कामामुळे प्रवासाच्या वेळेत नेहमीपेक्षा किमान तासभराने वाढ झाली आहे.

पश्चिम द्रुतगती मार्गावरुन जेव्हीएलआरची सुरुवात मूळातच अरुंद आहे. येथे सध्या मेट्रोचे खांब उभे करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे रस्त्याचा जवळपास निम्मा भाग व्यापला असून येथूनच वाहतूक कोंडीला सुरुवात होते. पुढे दुर्गानगर पर्यंतचा सारा रस्ता याच पद्धतीने केवळ दोन वाहनांसाठी शिल्लक राहीला आहे. या भागात दाट निवासी वस्ती आहे. परिणामी अनेक ठिकाणी अंतर्गत रस्तेदेखील छेदतात. त्यामुळे छोटी वाहने, पादचारी यांची वर्दळ वाढलेली असते. त्यात भर म्हणजे पादचाऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या पदपथांची अतिशय वाईट व्यवस्था झाली आहे. या सर्वामुळेच हा पूर्ण टप्पा पार करणे हे वाहनचालक आणि पादचारींसाठीदेखील संकट ठरते. जेव्हीएलआरवरुन पश्चिम द्रुतगती मार्गावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा दोन्ही दिशांनी वाहनांची संख्या प्रचंड असते. घाईगर्दीच्या वेळी त्यात वाढ होतेच, पण एरवीदेखील ही संख्या अधिक असल्यामुळे दिवसाच्या कोणत्याही वेळी वाहतूक कोंडीपासून सुटका होत नाही.

सीप्झजवळ रस्त्याच्या एकाच बाजूस काम सुरु असल्याने तुलनेने वाहतूक कोंडी कमी असली तरी पुन्हा मिलिंद नगर आणि एल अ‍ॅण्ड टी चौकात सध्या मेट्रोच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याने हा टप्प्यात वाहतूक कोंडीपासून थोडीशी मुक्तता मिळते. मात्र पुढे पार आयआयटीपर्यंत सर्वत्रच रस्तारोधकांमुळे रस्ता मर्यादीत होत जातो. याच टप्प्यात अनेक ठिकाणी खाजगी बसगाडय़ादेखील पार्क केलेल्या असतात. त्यामुळे आधीच अरुंद झालेला रस्ता आणखीनच आक्रसून जातो. पुढे आयआयटीपर्यत सध्या मेट्रोचे काम फारसे सुरु नाही मात्र रस्तारोधक लावलेले असल्याने वाहतूककोंडी कमी होण्याचे चिन्ह नाही.

पूर्व द्रुतगती मार्गाजवळ जेव्हीएलआर किमान सहा पदरी आहे, मात्र जोगेश्वरीकडे मार्गक्रमण करताना त्याची रुंदी कमी होत जाते. जेव्हीएलआरला छेदणाऱ्या अनेक ठिकाणी सध्या वेगवेगळ्या मेट्रोची कामं सुरु आहेत. पश्चिम द्रुतगती मार्गावर मेट्रो ७, एलबीएसवर मेट्रो ४ आणि सीप्झ येथे मेट्रो ३ चे काम सुरु आहे. या ठिकाणची वाहतूक कोंडी आणि जेव्हीएलआरवरील कोंडी यांचा एक एकत्रित प्रभाव सध्या या संपूर्ण परिसरातील वाहतूकीवर दिसून येत आहे. जेव्हीएलआरवरील मेट्रोचे काम सध्या अगदीच प्राथमिक अवस्थेत आहे. खांब उभे करण्याचे काम केवळ ७.८ टक्केच झाले आहे. तसेच मिलिंद नगर आणि एल अ‍ॅण्ड टी येथील कामाला सुरुवात झालेली नाही. हे पाहता येत्या पावसाळ्यात काम वाढत गेले की या संपूर्ण वाहतूक कोंडीत भरच पडणार आहे.

वादावादीचे प्रसंग

या मार्गावर रोज चारचाकीने प्रवास करणारे डॉ. राहुल राजवाडकर सांगतात की, सायंकाळी पाचऐवजी तासभराने उशिरा निघालो की नेहमीच्या वेळेत तासभराची वाढ होते. त्यातच रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनं एकमेकास घासण्याची शक्यता असते.

त्यातून वादावादीचे प्रसंगदेखील उद्भवतात. एलअ‍ॅण्डटी ते कळवा असा रोज प्रवास करणारे विवेक पाटील सांगतात की, पूर्वी या अंतरासाठी ४५ मिनिटे लागायची, पण सध्या दीड तास लागतो. वेळेतली ही वाढ गेल्या पंधरा दिवसापासून मेट्रोच्या कामात वाढ झाल्यापासून आहे.