गेल्या महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपवर एक टेबल फिरत होतं, ज्यात २०१८ मधील सुट्टय़ांची यादीच दिली होती. भटकायची आवड असेल आणि वर्षभरातील सुट्टय़ांचा पुरेपूर आनंद लुटायचा असेल, तर या आगामी सुट्टय़ांच्या तारखांकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नाही. कोणत्या सुट्टीत कुठं जायचं, हे वेळीच ठरवलंत, तर पैसे वाचतील आणि ऐन वेळची धावपळ, भ्रमनिरास टाळता येईल. चला तर मग, कोरं करकरीत कॅलेंडर उघडा आणि बेत आजच ठरवून ठेवा..

जानेवारी

प्रजासत्ताक दिनाला जोडून तीन-चार दिवसांची सहल नक्की करता येईल. रोड ट्रिप करायची असेल तर तळकोकणाकडे मोर्चा वळवा. गणपतीपुळे- वेंगुर्ले- मालवण- तारकर्ली- देवबाग असा कार्यक्रम ठरवा. डॉल्फिन क्रूझपासून स्कुबा डायव्हिंगपर्यंत अनेक आकर्षणं आहेत. ‘दिल्ली- आग्रा- मथुरा- भरतपूर’ असा कार्यक्रमही चार दिवसांत होईल (अर्थातच विमानाने दिल्ली गाठायची).

फेब्रुवारी

राजस्थानमधील मारवाडला भेट देऊ  शकता. या काळात एक झकास पर्याय म्हणजे सौराष्ट्र, द्वारका, पोरबंदर, वेरावळ, सोमनाथ, सासन गीर. सोमनाथापासून द्वारकेपर्यंत आणि गीरच्या जंगलापासून पोरबंदरच्या गांधी स्मारकापर्यंत सर्व वयोगटांची आकर्षणस्थळे येथे आहेत.

मार्च ते मे

सूर्याचा पारा चढत असताना गारव्यासाठी जायचं ते हिमालयात. दार्जिलिंग-सिक्कीमची निवड केलीत तर भारतातील हेरिटेज टॉय ट्रेनने प्रवास करण्याची संधी सोडू नका, मात्र त्यासाठी चार महिने आधी आरक्षण करावं लागेल हे ध्यानात ठेवा. हिमाचलमधील शिमला-मनाली जरा जास्तच गर्दीची ठिकाणं झाली आहेत, पण उन्हाळ्याच्या सुट्टीत धरमशाला- डलहौसी- चम्बा- खज्जियर या ठिकाणांना भेट दिलीत तर हिमाचलचं पहाडी सौंदर्य आणि शांतताही अनुभवता येईल. उन्हाळ्याचा उष्मा जाणवणार नाही असं भारतातील एकमात्र ठिकाण म्हणजे भूतलावरील नंदनवन अर्थात काश्मीर. यातील श्रीनगर- गुलमर्ग- पहलगाम ही सुप्रसिद्ध त्रिस्थळी पाहण्यासाठी जर एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ातील तारखा ठरवल्यात तर ‘टय़ुलिप महोत्सव’ पाहण्याची संधी साधता येईल. उत्तराखंडमधील नैनिताल-मसुरीचा परिसरही आल्हदायक असतो, त्याला जोडून दोन रात्री कॉर्बेट पार्कमध्ये काढल्या तर जंगल सफारीचा अनुभव घेता येईल. उन्हाळा म्हणजे टायगर सफारीसाठी सर्वोत्तम काळ. वन्यजीवप्रेमी आणि छायाचित्रकार उगाच का रणरणत्या उन्हात ताडोबापासून मध्य प्रदेशातील कान्हा-बांधवगड मार्गे राजस्थानातल्या रणथंबोपर्यंत उत्साहाने फिरत असतात. मात्र पार्क सफारीचे आरक्षण दोन महिने आधी करावे लागते हे विसरू नका. त्यामुळे एप्रिल-मेमधील ताडोबा किंवा कान्हाची पार्क सफारी फेब्रुवारीमध्येच बुक करा, अन्यथा जंगलाचा रस्ता बंद!

जून

परीक्षांचे निकाल, महाविद्यालयीन प्रवेश, नवे शैक्षणिक वर्ष यामुळे खरं तर हा ‘ऑफ सीझन’. याचाच फायदा घेत राजस्थान, उत्तर प्रदेशातील पर्यटन स्थळांचा आनंद कमी गर्दीत घेऊ  शकता.

जुलै ते ऑगस्ट

भंडारदरा, माळशेज, ताम्हणी घाट, शिवथर घळ, आंबोली, इगतपुरी हे सगळे मान्सून गेट वेज म्हणजे पावसाळ्यातील वीकेंडला चोरटय़ा धावा काढण्याचे अड्डेच! हा काळ लेह-लडाखच्या ‘दौऱ्या’साठी उत्तम. मात्र त्याची तयारी मेपासूनच करावी. लेहचा हवाईप्रवास नंतर महागडा होत जातो. ‘थ्री इडियट्स’नंतर लडाखमध्ये भारतीय पर्यटकांची गर्दी भलतीच वाढली आहे. तुम्हाला १० वर्षांपूर्वीचे शांत-निवांत लडाख अनुभवायचे असेल तर स्पिती व्हॅलीचा मार्ग धरावा. शिमल्यावरून सुरुवात करून काझामार्गे चंद्रतालला जाऊन मनाली गाठावी.

सप्टेंबर-ऑक्टोबर

सप्टेंबरमध्ये पावसाळा सरता सरता तुम्ही भारताचे हृदयस्थान असलेल्या मध्य प्रदेशातील इंदोर- उज्जन- मांडू या त्रिवेणीला भेट देऊ शकता. इंदोरमधील खादाडी आणि शॉपिंग, उज्जैनमधील श्री महांकाळेश्वराचे दर्शन आणि सरत्या पावसातील रोमँटिक मांडू गड यामुळे ही छोटीशी सहलही रंगतदार होऊन जाते.

नोव्हेंबर-डिसेंबर

पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागण्याचा आणि दिवाळी-नाताळच्या शालेय सुट्टय़ांचा हा काळ म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच! भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील कोणार्क- पुरी- कोलकातापासून ते दक्षिण भारतातील हम्पी- पत्तडकल- ऐहोळेपर्यंत आणि महाराष्ट्रातील अजिंठा- वेरुळ- औरंगाबादपासून ते ईशान्येतील आसाम- मेघालय- अरुणाचल प्रदेशपर्यंतची ठिकाणे निवडतानाच दमछाक होण्याची खात्री. त्यात जर हटके ठिकाणं हवी असतील तर कूर्ग, पाँडेचेरी, बेकल, सुंदरबन, चिल्का सरोवर, लँसडाऊन अशा जागांचा विचार अवश्य करावा.

उत्सव पर्यटन

याखेरीज उत्सव आणि सणांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या आपल्या देशात खास पर्यटकांसाठी साजरे केले जाणारे महोत्सव म्हणजे रणोत्सव, हॉर्नबिल महोत्सव, केरळमधील नौकांची शर्यत, हेमीस फेस्टिव्हल, खजुराहो महोत्सव. याच्या तारखा पाहून त्यानुसारही सहल ठरवू शकता. हा फक्त भारतातील पर्यटनस्थळांचा आढावा. वर्षभरातील प्रवासाचं नियोजन वर्षांच्या पहिल्या महिन्यात केल्यास विमान प्रवासाच्या सवलती, रेल्वेचं कन्फर्म तिकीट, आवडीचं हॉटेल, हवी ती जंगल सफारी असं बरंच काही खिशात टाकता येतं.

makarandvj@gmail.com