मुंबई : प्रवासी महिलेच्या बॅगेतील २४ लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. परेश जयंतीभाई रमाणी (३४) असे आरोपीचे नाव असून तो मुळचा गुजरात येथील रहिवासी आहे.
सोनम मेहता २ फेब्रुवारी रोजी रेल्वेने मुंबई सेंट्रल ते गुजरात असा प्रवास करीत होत्या. त्यांच्याजवळ दोन ट्रॉली बॅगा होत्या. त्यामध्ये त्यांनी हिऱ्यांचे दागिने ठेवले होते. मुंबई सेंट्रल ते बोरिवली या स्थानकातील प्रवासादरम्यान त्यांना झोप लागली. ही संधी साधून परेशने त्यांची बॅग पळवली. त्याबाबत सोनम यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये परेशने बॅग चोरल्याचे दिसत होते. खबऱ्यांकडून परेशची माहिती मिळविण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले होते. तो वांद्रे स्थानकात येणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार वांद्रे स्थानकात सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 29, 2020 12:11 am